Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : रस्ता सुरक्षेसाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Devendra Fadnavis : रस्ता सुरक्षेसाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

Subscribe

राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षात परिवहन क्षेत्राने नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावीत. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर द्यावा, यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.

मुंबई : राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षात परिवहन क्षेत्राने नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावीत. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर द्यावा, यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. (use artificial intelligence for road safety instruction of chief minister devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यांतर विविध खात्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, सांस्कृतिक कार्य, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच वस्त्राद्योग विभागाचा सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना विविध सूचना केल्या.

परिवहन सेवेला गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. 13 हजार जुनी शासकीय वाहने भंगारात काढली जावीत. टॅक्सी, ऑटोरिक्षा , शहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्यात यावेत. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-धाराशीव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. यंत्रणा बसविण्यात यावी, जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर अभियांत्रिकी उपाययोजना शोधून काढावी, असेही ते म्हणाले.

आवास योजनेतील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करावे

पंतप्रधान आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. यासाठी लवकरच घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी आणि लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर उर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाचा आढावा घेताना दिल्या.

या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राजगोपाल देवरा, संजय सेठी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव वीरेंद्र सिंह, सचिव रवींद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar