जनतेने नारायण राणेंचाही माज उतरवला होता, वैभव नाईकांचा नितेश राणेंना सूचक इशारा

Vaibhav Naik | जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे. तर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती अधिकाधिक निवडून येणार आहेत, असं वैभव नाईक म्हणाले.

vaibhav naik

मुंबई – नारायण राणे यांनीही सत्तेचा माज दाखवला होता. तेव्हा जनतेने त्यांचाही माज उतरवला होता. मंत्री असताना नारायण राणे पराभूत झाले. आता नितेश राणेंचा माजही जनता उतरवेल, असा सूचक इशारा शिवसेना ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. नितेश राणे यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून वैभव नाईक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा – नितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी; माझ्या विचारांचा सरपंच द्या, अन्यथा गावचा विकास होऊ देणार नाही!

नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील नांदगाव येथील ग्रामस्थ आणि कार्यकर्ता यांना धमकीवजा इशारा दिला आहे. आमच्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाच्या विकासासाठी निधी देणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय निधी देणार नाही. त्यामुळे आमच्याच विचारांचा सरपंच गावात निवडून यायला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून विरोधकांकडून टीका केली जात आहे.

नितेश राणे यांनी मतदारांना धमकी दिली आहे. तसेच सत्तेचा माज कसा असतो हे नितेश राणे यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापासून जिल्हाधिकारी हे आपल्या खिशात आहेत, असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. यालाच सत्तेचा माज म्हणता येईल. नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनता आम्हाला विजयी करेलच. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे. तर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती अधिकाधिक निवडून येणार आहेत, असं वैभव नाईक म्हणाले.

नितेश राणे काय म्हणाले?

सरपंचपदाला न्याय देईल असा उमेदवार आम्ही दिला आहे. केवळ नामधारी उमेदवार दिला नाही. गावाचा विकास करेल, गरज पडल्यास माझ्याशी बोलेल. राणे साहेबांशी बोलेल, अशी व्यक्ती आम्ही उमेदवार म्हणून दिली आहे. नांदगाव हे महामार्गालगत गाव आहे. त्यामुळे साईड रोड बनेल तेव्हा दोन्ही बाजूंना विकास होईल. तेव्हा येथे आपल्या विचारांचा सरपंच असणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून मी स्पष्टपणे सांगत आहे.

आम्ही नारायण राणेंच्या तालमीत तयार आजेलेल विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाही. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही, याची मी निश्चीतपणे काळजी घेईन. आता याला तुम्ही धमकी सजमा किंवा काहीही समजा. कारण आता सगळा निधी माझ्या हातात आहे, असंही ते म्हणाले.