Homeमहाराष्ट्रमराठवाडाAjit Pawar : अजित पवारांकडून मुल्यशिक्षणाचे धडे; मकोका लावायला कमी करणार नाही,...

Ajit Pawar : अजित पवारांकडून मुल्यशिक्षणाचे धडे; मकोका लावायला कमी करणार नाही, कार्यकर्त्यांना सज्जड दम

Subscribe

बीड – बीड जिल्ह्यामध्ये कोणतेही वेडेवाकडे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही. रिव्हॉल्व्हर हवेत उडवणे, रिल्स बनवणाऱ्यांचे शस्त्र परवाने तत्काळ रद्द केले जातील. जो कोणी वेडेवाकडे प्रकार करेल त्याला मकोका लावायलाही कमी करणार नाही. बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीपूर्वी अजित पवारांनी पक्षाच्या कार्यालयाला हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी, चुकीची कामे खपवून घेणार नाही, आवश्यक असेल तर ‘मकोका’ लावायलाही कमी करणार नाही, असा सज्जड दमच कार्यकर्त्यांना दिला आहे.

तथ्य असेल तर कारवाई होणार – अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पहिल्याच भेटीत आपल्या कामाची पद्धत समजावून सांगतली आहे. मी येथे विटीदांडू खेळायला, पतंग उडवायला आलेलो नाही. काम करायला आलो आहे. माझी कामाची पद्धत वेगळी आहे. जिथे तथ्य असेल तेथे संबंधितांवर कारवाई केली जाईल, जिथे तथ्य नसेल तिथे कारवाई केली जाणार नाही. कामात वेडेवाकडे प्रकार झाले तर ते मी सहन करणार नाही, असा इशारा अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पादधिकाऱ्यांना दिला. यावेळी पक्षाचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय देशमुख त्यांच्या बाजूलाच उभे होते.

ते म्हणाले की, जिल्ह्या नियोजन समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या विकासासाठी पैसा दिला जातो. हा जनतेचा पैसा आहे, तो सत्कारणी लागला पाहिजे. आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये, याची काळजी घ्यायची आहे.

अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असाही इशारा दिला. ते म्हणाले की, मी जातीपातीचा, नात्यागोत्याचा कधीच विचार केलेला नाही. आपल्यासमोर शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. तो आदर्श समोर ठेवून आपल्याला काम करायचे आहे.
जो कोणी वेडेवाकडे प्रकार करेल त्याला त्याला ‘मकोका’ लावायलाही कमी करणार नाही.

अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत

बीड जिल्ह्यात पोलीस दलासोबतच विविध विभागात दहा ते पंधरा वर्षांपासून अधिकारी ठाण मांडून बसले असल्याचा आरोप होत आहे. कोणाचेही नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बरेच अधिकारी येथे बरीच वर्षे राहिलेले आहेत, त्यातही बदल केले जाणार आहे. चुकीच्या गोष्टी चालत आल्या असतील तर त्यात बदल केले जातील. आम्ही
टीव्हीवर पाहत असतो की, बीड जिल्ह्यात रिव्हॉल्व्हर हवेत उडवतात. रिव्हॉल्व्हर हातात घेऊन रिल्स बनवल्या जातात, असे यापुढे आढळून आले तर त्यांचे शस्त्र परवाने तत्काळ रद्द केले जातील. सर्वांना नियम सारखे राहतील. बदल झाला पाहिजे, तो सर्वसामान्य नागरिकांनाही जाणवला पाहिजे. मलाही जाणवला पाहिजे, असा सज्जद दम त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एक प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांनाही दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राला आणि देशाला सत्ताधारी पक्षाने कसे काम करावे याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या आदर्शावर आपला पक्ष काम करतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे चारित्र्य स्वच्छ ठेवा. चुकीच्या पद्धतीची लोकं आपल्या आजूबाजूला असता कामा नये.

पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको

चुकीची कामे कोणी करत असेल तर त्यांच्यावर पोलिस कारवाई केली जाईल. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही. महायुतीच्या तिन्ही पक्षांचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, अन्याय कोणावर होता कामा नये, मात्र चुकीच्या पद्धतीने कोणी भरडले जाता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.

बीड जिल्ह्याची बदनामी थांबवायची – अजित पवार

बीड जिल्ह्याची बदनामी माध्यमांमध्ये सातत्याने केली जात आहे, ते आपल्याला थांबवायचे आहे, असे सांगत अजित पवार म्हणाले की, एकटा अजित पवार जिल्ह्याची बदनामी थांबवू शकत नाही. मी एकटा ते करु शकत नाही. यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागेल. जिल्ह्यातील एनजीओंची साथ लागेल, जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स यांचीही साथ लागेल.

हेही वाचा : Ajit Pawar in Beed : पालकमंत्री अजित पवार सकाळीच बीडमध्ये दाखल; धनंजय मुंडेंनी केले स्वागत