शाळांमध्येही दुमदुमले आषाढी एकादशीचे टाळ

मुंबईसह राज्यात ‘आषाढी एकादशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक शाळांमध्ये आषाढी साजरी करण्यात आली. वनिता विकास शाळेने शिशु वर्गासाठी दिंडी काढली…पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकऱ्यांचे दैवत पांडुरंगाची मनोभावें विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. या आषाढी एकादशीनिमित्ताने घाटकोपर (पूर्व) येथील वनिता विकास मंडळ संचालित शिशु विकास – वनिता विकास प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून ‘ विठ्ठल विठ्ठल , जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत पायी ‘दिंडी’काढली.

या दिंडीत विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची वेशभूषा, पालखी आणि लेझीमचा खेळ यांनी घाटकोपरवासीयांचे ध्यान आकर्षित करून घेतले. वनिता विकास शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांची ‘नाम दिंडी’ काढण्यात आली. या नामदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

तसेच, या विद्यार्थ्यांमध्ये, ‘विठ्ठल व रुक्मिणी’ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधले. शनिवारी दुपारच्या सुमारास ही विद्यार्थी दिंडी शालेय परिसरातच काढण्यात आली. या नामदिंडीत शालेय शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, काही पालक यांनीही सहभाग घेतला. तर विद्यार्थ्यांनीही या नाम दिंडीचा चांगलाच आनंद लुटला.


हेही वाचा : राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन