शिंदे गटाच्या मेळाव्यातील शाही थाट! व्हॅनिटी व्हॅनसह दिसणार ‘या’ सुविधा

vanity van parked for cm eknath shinde in bkc ground ahead of dasara melava

शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात कायदेशीर लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. आपलीच शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटात चढाओढ सुरु झाली आहे. यात आजचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी अधिक महत्त्वाचा आहे. दोन्ही गटाचे भवितव्य या दसऱ्या मेळाव्यावर अवलंबून असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दोन्ही मेळाव्यांची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगतेय. कोणाचा दसरा मेळावा हा अधिक भव्यदिव्य होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष तर आहेच पण दोन्ही गटानेही त्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र हे प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला, यानंतर शिंदे गटाने बीकेसी मैदानात जोमाने दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली. या मेळाव्यात आपली ताकद सर्वाधिक दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रत्येक गटातील आमदारावर एक एक जबाबदारी दिली. यातील बहुतांश आमदार ग्रामीण भागातील असल्याने त्यांनी आपल्या मतदार संघातील शेकडोच्या शेकडो कार्यकर्त्यांना विविध वाहतूक पर्यायांनी मुंबईत आणले आहे. यासाठी 1700 एसटी बसेसही बूक करण्यात आल्या आहेत. एसटी बसेससाठी शिंदे गटाने 10 कोटी मोजल्याचा दावा केला जातोय.

यात एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसीमध्ये एक व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही व्हॅनिटी व्हॅन मागवल्याचे बोलले जाते. व्यासपीठाच्या मागेच ही व्हॅनिटी व्हॅन उभी केली आहे. या व्हॅनमध्ये आरामदायी सोफा, विश्रांतीसाठी बेड, आणि बैठक घेण्यासाठी व्यवस्था आहे. याशिवाय ड्रेसिंग टेबलची सुविधा देखील दिली आहे. एकनाथ शिंदे व्यासपीठावर येण्याआधी या व्हॅनिटी व्हॅनमध्ये थांबतील अशी माहिती आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना देखील खास खाण्याची आणि वाहतुकीची सोय केली आहे. यात आमदारांसाठी 51 खास वेगळ्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अशाप्रकारची सर्व व्यवस्था यापूर्वीच्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात कधीही पाहायला मिळाली नाही.

तर दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानातही दोन व्हॅनिटी पार्क करण्यात आल्या आहेत. यातील एका व्हॅनिटीमध्ये ठाकरे कुटुंबीय आणि दुसऱ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पक्षातील वरिष्ठ नेते थांबतील अशी चर्चा आहे. या व्हॅनिटीमध्येही सोफा, बेड, ड्रेसिंग टेबलची सुविधा देण्यात आली आहे.


शिंदे – ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्या मुंबईच्या ट्राफिक नियमात बदल; हे प्रमुख रस्ते राहणार बंद