Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील फाईल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. २४ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे शाळेतील व्यवस्थापक, शिक्षक, मुख्याध्यापक, पालकवर्ग, शिक्षणाधिकारी, स्थानिक प्रशासन, सीईओ, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर यासंदर्भातील निर्णय घेतले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या ठिकाणी रूग्णांची संख्या जास्त असेल त्या ठिकाणी पूर्णपणे कोरोना प्रोटोकॉलचं पालन करूनच शाळा सुरू केल्या जातील. यासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. २४ तारखेपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून पहिले ते बारावी आणि शिशुवर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुलांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता

या शाळा सुरू करत असताना मागील दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी मुकाबला करत आहोत. ज्याप्रकारे आपण कोरोनाचा सातत्याने सामना करत आहोत त्याप्रकारे आम्ही नेहमीच काळजी घेतलेली आहे. मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता राहिलेली आहे. त्यामुळे याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष देवून स्थानिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला पाहीजे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्णपणे आढावा घेऊनच भविष्यातले पुढील निर्णय घेण्यात यावे. तसेच सर्वांनी काळजी घेऊनच या शाळा सुरू करण्यात याव्यात, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

शाळा ऐच्छिक असणार की ऑनलाईन ?

मागील काळात सुद्धा शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला होता. त्यावेळी टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, पालकांची संमती आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती देतील त्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. परंतु शिक्षण कोणाचही थांबू नये हा मागील काळापासून प्रयत्न आहे आणि तो भविष्यातही सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी शाळेपासून बाजूला राहणार नाही. या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेतले जातील, असं गायकवाड म्हणाल्या.


हेही वाचा : असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, वनरक्षक दाम्पत्याच्या मारहाणीची आदित्य ठाकरेंकडून दखल


हेही वाचा : सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू ? शिक्षण विभागाने पाठवला मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव