वसंत मोरेंनी पुण्यात घेतली राज ठाकरेंची भेट, ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

Vasant More met Raj Thackeray in Pune
Vasant More met Raj Thackeray in Pune

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंग काढण्याबाबत आंदोलन पुकारले आहे. यानंतर वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रज गावठाणच्या हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे या महाआरतीला उपस्थित राहीले नाहीत. यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटील गेले असता वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो, असा सल्ला त्यांनी दिल्याचे वसंत मोरे म्हणाले.

शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महाआरतीला उपस्थित राहतील अशी शक्याता होती. मात्र, ते महाआरतीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज ठाकरे यांची पुण्यातील निवासस्थान राजमहाल याठिकाणी वसंत मोरे यांनी भेट घेतली. यावेळी राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचे मला माहीत नव्हते. प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली. पण त्यापूर्वीच मी महाआरतीचे आयोजन केले होते. त्याबद्दल राज ठाकरेंना मेसेज करून कळवले होते, असे वसंत मोरे म्हणाले.

भेटीत आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबाबत चर्चा झाली. काल (शनिवारी) झालेल्या महाआरतीचे साहेबांनी कौतुक केले. साहेबांना काल येता आले नाही. पण वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राज ठाकरेंना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितले आहे. साहेब निश्चित लवकरच येतील, त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असेही मोरे यावेळी म्हणाले.