घरताज्या घडामोडीप्रा. वासंती सोर यांचे निधन

प्रा. वासंती सोर यांचे निधन

Subscribe

सर्वोदय चळवळ आणि जीवन उत्सव परिवाराचा आधारस्तंभ हरपला

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे रविवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. नाशिकमधील सर्वोदय आणि जीवनउत्सव परिवाराच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्यावर सोमवारी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्वातंत्र सैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या तेवढ्याच निष्ठावंत कन्या प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी ६ वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत काही काळ त्यांच्या सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. तसेच जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसर्‍या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेख ही त्या नेहमी करत.

- Advertisement -

त्यांनी नाशिकच्या बी एड कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या पूर्णपणे सामाजिक जीवनात कार्यरत झाल्या. गांधी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची विशेषता. गांधींजींवर असणार्‍या तथाकथित आक्षेपांना संपूर्ण पुराव्यानिशी सडेतोड व चपखल उत्तर देणारे लिखाण त्यांनी लेख व पुस्तकांच्या माध्यमातून केले. त्यांच्या पश्चात दोन मुले तुषार आणि तरंग, सुना गीता आणि सायली आणि नात तेजस्विनी असा परिवार आहे.

चीन आक्रमणाच्या वेळेस युवांच्या अभ्यासमंडळ आणि कलापथकाचे संयोजन त्यांनी केले होते. नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यात त्यांच्या सक्रीय सहभाग असे. १९८८ ते ९० या काळात समाजवादी महिला सभेच्या नाशिक शाखेच्या त्या अध्यक्षाही होत्या. सर्वोदय प्रेस सर्व्हिसच्या त्या ४ वर्षे सहसंपादक होत्या. नाशिकच्या जीवन उत्सव या पर्यावरणीय जीवन शैली व गांधी विचारावर काम करणार्‍या उपक्रमाच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या जाण्याने गांधी आणि सर्वोदय परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली असून जीवन उत्सव परिवार पोरका झाल्याची भावना कार्यकर्त्यांची व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -