मुंबई – महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह समोर येऊ लागली आहेत. खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसची नैसर्गिक आघाडी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या तयारीचे ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही स्वागत होत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंसाठी महाविकास आघाडी तुटल्याचा आंबेडकरांचा दावा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याचा सूर आळवला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एक्स या सोशल मीडियावर एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, “शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे.”
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी तुटल्याचाच दावा केला असून आदित्य ठाकरे यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले आहे. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वेळा त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिवसेना शिंदे गटानेही ठाकरे- फडणवीस भेटीवरुन टीका केली होती.
Shiv Sena (UBT)’s decision to break the MVA has been taken in the personal interest of Aditya Thackeray.
शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 11, 2025
शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर थेट राज्यात एकनाथ शिंदे महायुतीसोबत आहेत म्हणून 225 हून अधिक जागा जिंकून आल्याचा दावा केला. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते, ही नवीन जात पहिल्यांदा पाहिली, म्हणत ठाकरे गटाला डिवचले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वबळाचा निर्णय संजय राऊत यांचा वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जाईल असेही म्हटले आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही स्वबळावर लढल्या पाहिजे होत्या. असे म्हणत राऊतांच्या संकेतांचे स्वागत केले आहे.
ठाकरे गटाच्या स्वबळाच्या संकेतावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असे म्हटले होते. त्यानंतर ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे सांगणे कठीण असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा : Ravindra Chavan : भाजपने रवींद्र चव्हाणांना दिली मोठी जबाबदारी; महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती