महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटिंगदरम्यान तरूण दरीत कोसळला

महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरात पन्हाळगडावरील सज्जा कोटी वरील तटबंदीवर सुरू होतं.

Vedat Marathe Veer Daudle Saat Set

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर एक तरूण खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाला असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरात पन्हाळगडावरील सज्जा कोटी वरील तटबंदीवर सुरू होतं. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी काही घोडे देखील मागवण्यात आले होते. त्या घोड्यांना सांभाळण्याचं काम करणारा तरूण खोल दरीत कोसळला. नागेश खोबरे असं या तरूणाचं नाव आहे. काल रात्री पावणे नऊ च्या सुमारास ही घटना घडली.

सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर हा १९ वर्षीय तरूण फोनवर बोलत होता. फोनवर बोलत बोलत जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. कोणीतरी दरीत कोसळल्याचं समजताच शूटिंगच्या सेटवर असलेल्या लोकांनी त्याच्या मदतीसाठी धावधाव केली. दरीत पडलेल्या तरूणाला वर काढण्यासाठी दोर खाली सोडली. दोरीच्या मदतीने तरूणाला बाहेर काढण्यात यश आलं. परंतू यात तरूणाच्या छातीला, डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर त्याला कोल्हापूरमधील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वेगवेगळ्या वादात अडकला होता. चित्रपटामधील सात वीरांची नावं बदलण्याचा आरोपावरून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, सत्या मांजरेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेच्या नावाची चर्चा जोरात सुरूय.