माजी केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; २ ठार, ३ जखमी

वर्धा जिल्ह्यातील चंद्रपूर-नागपूर या मार्गावरील कांडळीजवळ आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातामध्ये हंसराज अहीर सुखरूप आहेत.

अशी घडली घटना

एका भरधाव असणाऱ्या ट्रकने हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला म्हणजेच CRPF च्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला त्यात सीआरपीएफच्या एका जवानाचा आणि एका महाराष्ट्र पोलीसाचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील चंद्रपूर-नागपूर या मार्गावरील कांडळीजवळ आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

हंसराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहनाचा चालक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका गंभीर स्वरूपाचा असल्याने ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीचा चुराडा झाला आहे.