घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुजरातेत वाहन चोरून नाशिकमध्ये विक्री

गुजरातेत वाहन चोरून नाशिकमध्ये विक्री

Subscribe

गुन्हे शाखा २ च्या पथकाने ठोकल्या टोळीला बेड्या; तिघे अटकेत, एक फरार

नाशिक : गुजरातमधून चोरलेली इको कार नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सापळा रचत ताब्यात घेतले आहे. आडगाव जकात नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून कारसह तीन मोबाईल असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, नाशकातून राजस्तानला कार चोरून विक्री करण्याची टोळी कार्यरत असल्याचे अनेकदा उघड होत असताना आता गुजरातेतून नाशकात कार विक्रीसाठी आणल्याची घटना घडल्याने परस्पर राज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हे शाखा २ च्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पिंकल श्रवण पाडवी (वय २२), जसवंत रमेश वसावा (वय २२), रुस्तम नगीनभाई वसावा (वय २०, तिघे रा. जि. नर्मदा, राज्य-गुजरात) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार संशयित मोहन वसावा हा फरार झाला आहे. गुजरातमधील काही चोरटे इको कार विक्रीसाठी शहरात येणार असल्याची माहिती हवालदार गुलाब सोनार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे यांनी जकात नाका परिसरातून तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. तपासणीत त्यांच्याकडे वाहनाचे कुठलेही ठोस कागदपत्र मिळून आले नाहीत. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवताच उमरपाडा पोलीस ठाणे हद्दीतील नसारपूर गावातून हे वाहन चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. उमरपाडा पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

गुजरात राज्यातून चोरी अन् शहरात स्वस्तात विक्री

नसारपूर येथून ही टोळी कार चोरी करुन नाशकात दाखल झाली. येथील काही ओळखीच्या मित्रांच्या ओळखीने ते ही कार स्वस्तात विक्री करणार होते, असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही या टोळीने चोरीच्या कार आणून शहरात विक्री केल्याचा संशय असून पथकाकडून त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. यातील फरार संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -