मुंबई – छत्रपती शिवाज महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, असे वक्तव मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच केले आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच या देशातील मुघलांना संपवण्यासाठी झाला होता, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. तसेच अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधीच्या वक्तव्यांची जणू स्पर्धाच लागली आहे. नितेश राणे यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असा दावा एका जाहीर सभेत केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 19 निष्ठावंत मुस्लिम सरदारांची यादीच ट्विट केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नितेश राणेंना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आता भाजप आमदार मिटकरींना भिडले आहेत.
मिटकरीचा इतिहास कच्चा
अमोल मिटकरींना ब्रिगेडी इतिहासकार म्हणत भातखळकर म्हणाले की, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा आहे. खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. रायगडावर मशीद बांधली होती, असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही, असेही आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
आमदार अतुल भातखळकर यांनी नुकताच सभागृहामध्ये मशिदीवरील भोंग्यांसंबंधी लक्षवेधी उपस्थित केली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश दिले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका आहे, हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असेही भातखळकर म्हणाले. मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतपेढीला धोका पोहचला असल्याची टीका देखील त्यांनी केली.
अबू आझमींवर निशाणा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा करत औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणीस्तान पर्यंत होती. देशाची जीडीपी 24% होता, देशाला सोन की चिडियाँ म्हटले जात होते, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर औरंगजेबाजी कबर महाराष्ट्रात नको इथपर्यंत सत्ताधारी आमदारांकडून मागणी होऊ लागली आहे. तर भातखळकर म्हणाले,अबू आझमीला बडगा मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणारे ट्विट देखील केलं आहे. त्यामुळं या देशातील हिंदू हा नेहमीच सहिष्णु असतो, शांतता प्रिय असतो. देशात कायद्याचं राज्य आहे. कायद्या अंतर्गत प्रत्येकाने वागलं तर मुख्य म्हणजे अबू आझमीने आपलं तोंड बंद ठेवलं तर असे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत असे भातखळकर म्हणाले.
हेही वाचा : Ladki Bahin : लाडक्या बहीणींसाठी सामाजिक न्याय विभागावरच अन्याय; तब्बल 7 हजार कोटींचा निधी वळवला