FDA ची फार्मासिस्टवर धडक मोहीम; परवाने होणार रद्द

verify the presence of pharmacists in Food and Drug Administration medical stores
FDA ची फार्मासिस्टवर धडक मोहीम; परवाने होणार रद्द

अनेकदा मेडिकलमध्ये ज्या व्यक्तींच्या नावे परवाना आहे, अशी व्यक्ती न आढळता भलतीच व्यक्ती दिसून येते. दुसऱ्यांना मेडिकल चालवण्यास देणाऱ्या परवानाधारक व्यक्तींवर पडताळणीची धडक मोहीम अन्न व औषध प्रशासनाकडून राबवण्यात आली होती. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीमध्ये एफडीएची ही धडक मोहीम राबवण्यात आली होती. या कालावधीत २७७ मेडिकलमधील औषध विक्रेत अनुपस्थित आढळल्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून त्यांचे परवाने रद्द सारखी सक्त कारवाई करण्यात आली आहे.

मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच वर्गीकृत औषधांची विक्री केली जावी अशी कायदेशीर तरतूद आहे. तरीसुद्धा काही मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट यांच्या गैरहजेरीत औषधांची विक्री केली जाते, असे काही प्रकरण निदर्शनास आल्याने याबाबत पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत परिमल सिंह, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार संपूर्ण राज्यात रजिस्टर फार्मासिस्टच्या उपस्थितीबाबत पडताळणीसाठी धडक मोहिम राबविण्यात आली.

या कालावधीत राज्यभर ३ हजार ४६० मेडिकल तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी २७७ ठिकाणी फार्मासिस्ट गैरहजर आढळून आलेत. तसेच २४६ औषध विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. २७७ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा, अशी नोटीस बजाविण्यात आली असून त्यांच्यावर परवाने रद्दसारखी सक्त कारवाई करण्यात येईल. जर एखाद्या औषध विक्रेत्यांकडे काही कालावधीसाठी रजिस्टर फार्मासिस्ट नसल्यास त्यांनी त्या कालावधीत औषधांची विक्री करू नये आणि त्यांचे दुकान बंद ठेवावे. यापुढे जर रजिस्टर फार्मासिस्ट यांच्या गैरहजेरीत वर्गीकृत औषधांची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील याची सर्व औषध विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. ग्राहकांनी सुद्धा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर आणि विक्री बिला सह औषधांची खरेदी करावी असे आव्हान अन्न व औषध प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

तसेच ग्राहकांना फार्मसिस्ट च्या गैरहजेरी बाबत काही तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक संबंधित सह आयुक्त /सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात किंवा [email protected] या इमेल वर तक्रार करू शकता.