ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन

kamlakar nadkarni

मुंबई – ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन शनिवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले दोन-तीन महिने ते आजारी होते. अंत्ययात्रा आज, रविवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

कमलाकर नाडकर्णी गेल्या पन्नास वर्षांपासून नाट्यसमीक्षक होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांचं समीक्षण केलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकप्रभामधून नाट्यसमीक्षा लिहिली. त्यानंतर, महाराष्ट्र टाईम्समधून ते नाट्यसमीक्षा लिहित असत. त्यांना मानाचे सहा पुरस्कार मिळाले असून महानगर नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. तसंच, त्यांनी काही वर्षे सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत म्हणूनही काम केलं.

कमलाकर नाडकर्णी प्रत्येक नाटकाचा बारकाव्याने अभ्यास करत. अनेक सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक यांच्या नाटकांची त्यांनी पिसे काढली आहेत. त्यामुळे नाट्यसृष्टीत त्यांचा दबदबा होता. त्यांनी लिहिलेली समीक्षा वाचायला प्रेक्षकांसह कलासृष्टीही आतूर होती.