मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) चार अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधक भाजपा आणि महायुतीवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे. अशातच आता अनिल देशमुख यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. (Anil Deshmukh holds BJP responsible for attack on vehicle)
गाडीवर दगडफेक झाल्यानंतर अनिल देशमुख यांना सुरुवातीला काटोल ग्रामीण रुग्णायलयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून आणि तपासणी करून डॉक्टरांनी अनिल देशमुख यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात पाठवले. यानंतर आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट भाजपावर हल्लाबोल केला. अनिल देशमुख म्हणाले की, भाजपाला मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यावर दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. याप्रकरणी आता भाजपा काय प्रतिक्रिया देते? हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा
काय आहे प्रकरण?
दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना सांगतिले की, आम्ही सर्वजण सोमवारी (18 नोव्हेंबर) नरखेडवरून तिनखेडा भिष्णुर मार्गे काटोलला जाण्यास निघाले. त्यावेळी अनिल देशमुख यांची गाडी पुढे व त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या होत्या. काटोलला घरी परतत असताना रात्री 8.15 ते 8.30 वाजताच्या दरम्यान बेल फाटा येथे गाडी आली. हा रस्ता वळणाचा असल्याने गाडीची गती कमी केली असता अचानकपणे चार अज्ञात व्यक्तींनी गाडीवर दगडफेक केली. या घटनेवेळी अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. यावेळी एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड फेकला. त्यानंतर अनिल देशमुख हे ज्या बाजूला बसले होते, तिथे दगड फेकला. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा अनिल देशमुख बसलेल्या जागीच दगड फेकला. ही दगडफेक सुरू असतानाच अज्ञातांनी “भाजपा जिंदाबाद, अनिल देशमुख मुर्दाबाद” अशी घोषणा दिली. यानंतर चौघेही दोन दुचाकीवर बसून भारसिंगी रोडने पळून गेले. अनिल देशमुख यांच्या कपाळाला दुखापत झाल्यामुळे त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहीत उज्वल भोयर यांनी पोलिसांना दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी राऊतांची टीका