चंद्रपूर – महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानतंरही एक सन्नाटा पसरलेला आहे, महायुतीच्या नेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच केले. विधानसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही सावरलेले नाहीत. त्यांची समाधी लागली आहे, ते शुन्यात आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर भाजप नेते आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी समाचार घेतला आहे. “विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही. ते बरोजगार झाले आहेत.” अशी टीका त्यांनी केली.
विरोधकांना काम राहिलेले नाही – नितेश राणे
मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आज चंद्रपूरमध्ये धर्मसभेसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते अस्वस्थ आहेत का? या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, “कोणी अस्वस्थ नाही. सगळे खुश आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याचे काम संभाळत आहोत. आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही. ते बरोजगार झाले आहेत. त्यांनी बेरोजगार संस्थेत नोंदणी करावी. आमचं सरकार त्यांना काहीतरी काम देईल.” असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.
आदित्य ठाकरेंबद्दल सामनातून लिहावे – नितेश राणे
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत हेच एका खासदाराच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राऊतांनी त्यांची लंगोट सांभाळावी, नंतर दुसऱ्याच्या घरात डोकवावे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात खदखद आहे. त्यावर संजय राऊतांनी सामानातून लिहावे, असा सल्लाही मंत्री नितेश राणेंनी दिला.
“संजय शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये”
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करेन असे म्हटले होते. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत रहावेत. पण त्या बद्दल एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच काय मत आहे, याबद्दल त्यांनी विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.”
नितेश राणे हे मुस्लिमांबद्दल आक्रमक बोलत असतात, त्यावर विरोधकांनी तुम्ही मंत्री आहात, आता सुधरले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले, “सुधारायला मी अजून बिघडलो कुठे? धर्माबद्दल बोलणारे कधी बिघडत नाहीत. आम्ही सुधारलेले आहोत. जे बिघडलेले लोक आहेत. ज्यांना आपला धर्म आणि इस्लाम समजलेला नाही, कुराणमध्ये काय लिहिलय ते समजलं नाही, त्यांची सुधारण्याची वेळ आली आहे.”असेही मंत्री राणे म्हणाले.
हेही वाचा : Shiv Sena : 2024 नंतरही मुख्यमंत्री राहणार या आश्वसानामुळेच एकनाथ शिंदे फुटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा