राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) फायरब्रँड प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेत्यानं मारहाण केल्याचा दावा नितेश कराळे मास्तर यांनी केला आहे. यावेळी कराळे मास्तर यांना शिवीगाळही करण्यात आली आहे.
वर्ध्यातील एका बूथवर ही घटना घडली आहे. भाजपचा नेता आणि उपसरपंचानं ही मारहाण केल्याचं कराळे मास्तर यांनी म्हटलं आहे. सोबत असलेल्या बायकोला आणि दीड वर्षांच्या मुलीलाही मारहाण झाली, असा आरोपही कराळे मास्तर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादांनी दाखवलं मिडल फिंगर अन् करंगळी; म्हणाले, “अरे वेड्यांनो…”
नितेश कराळे मास्तर म्हणाले, “मी माझ्या गावात मतदान करून वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो होतो. उंबरी गावात थांबून मी लोकांना विचारपूस केली. पोलिसांनी सांगितलेलं की, बूथवर दोन खुर्च्या ठेवण्यात याव्यात. मात्र, समोर आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. तिथे आठ लोकांसह ग्रामपंचायतीचे कर्मचारीही बसलेले होते.”
“त्यामुळे मी पोलिसांना फोन केला. पोलीस कर्मचारी येतो म्हणाले. मी रस्त्यावरून दोन पावले चालून पुढे विचारण्यासाठी गेलो. मात्र, भाजपचा नेता आणि उंबरीचा उपसरपंच असलेल्या सचिन खोसे थेट माझ्या अंगावर धावून आला. सचिन खोसेवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. मी सचिन खोसेला काहीही बोललो नाही. त्यानं थेट मला मारहाण करण्यास सुरूवात केली. माझ्यासोबत असलेली पत्नी अडविण्यास आली, तर तिचाही गळा पकडण्यात आला. शिवीगाळ करून तिलाही मारहाण करण्यात आली. दीड वर्षांच्या मुलीलाही मारहाण झाली,” असा आरोप कराळे मास्तर यांनी केला आहे.