राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली आहे. देशमुख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, भाजप नेत्यानं वेगळाच दावा केला आहे.
नरखेड-काटोलचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून येताना चार युवक अचानक देशमुख गाडीसमोर आले. एकानं गाडीच्या काचेकर दगडफेक केली. तर, एका मोठा दगड अनिल देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्त्राव झाल्यानं देशमुख यांना काटोल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलं. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
हेही वाचा : हल्ल्यावेळी नेमके काय घडले? देशमुखांचे स्वीय सहाय्यकांनी सांगितला घटनाक्रम
मात्र, सलील देशमुख जिंकू शकत नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांचं नाटक असल्याचा आरोप भाजप नेते, परिणय फुके यांनी केला आहे. परिणय फुके म्हणाले, “अनिल देशमुख हे नाटक करत आहेत. मागील 25 वर्षांपासून अनिल देशमुख काटोलच्या जनतेला मुर्ख बनवण्याचं काम करत आहे. कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत.”
“सलील देशमुख काटोलमधून रिंगणात उतरले आहेत. मात्र, सलील देशमुख जिंकू शकत नाहीत. त्यामुळे खोटी दगडफेक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला आहे,” अशी टीका परिणय फुके यांनी केली आहे.
हेही वाचा : अनिल देशमुख गाडीवर हल्ला प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…