घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटसिव्हिल करोना कक्षात आता व्हिडिओ कॉलिंग सुविधा

सिव्हिल करोना कक्षात आता व्हिडिओ कॉलिंग सुविधा

Subscribe

रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

साईप्रसाद पाटील : नाशिक

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आता करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात असून, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने डिजिटल प्रणालीवर भर दिला आहे. रुग्णांना भेटण्यासाठी वा त्यांची विचारपूस करण्यासाठी गर्दी करणार्‍या नातेवाईकांना आवर घालण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने सहा अँड्रॉईड मोबाईल्सची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक आणि व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून, यासाठी करोना कक्षात नियोजित वेळेत हे सहा मोबाईल ठेवण्यात येतील. याद्वारे करोना रुग्ण आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधतील. यामुळे रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस आणि त्यांच्या जेवण वा औषधांविषयी विचारणा करणार्‍या नातेवाईक वा मित्रांची होणारी गर्दी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, करोनाबाधितांंचे समुपदेशन करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसाठीही विशेष मोबाईल सुविधा देण्यात येणार आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी या दृष्टीने नियोजन करत असून, दोन दिवसांत ही सुविधा नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना ही सुविधा मिळेल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निखिल सैंदाणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

संसर्गाचा धोका कमी होणार

करोना रुग्ण असतानाही त्याला भेटण्यासाठी धडपडणार्‍या नातेवाईकांची संख्या धोकादायक आहे. आपल्या कुटुंबातील बाधित सदस्याला वेळेवर औषधे, जेवण व अन्य सुविधा मिळतात की नाही याविषयी नातेवाईकांना अनेक प्रश्न असतात. याचा विचार करून ही सुविधा देत आहोत. यामुळे नातेवाईकांची रुग्णालयात होणारी गर्दी कमी होऊन संसर्गाचा धोकाही टळेल. येत्या दोन दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होईल व रुग्ण निर्धारित वेळेत आपल्या कुटुंबियांशी संवाद साधू शकतील.
– निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -