Video : …तर शिवरायांचे नाव घेऊ नका, ठाकरे गटाचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा

uddhav thackeray attack cm eknath shinde group on election commission shivsena symbol row

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (तिथीनुसार) आज देशभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडूनही या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा भाग ऐकवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, “पैशांचे जर लाचार व्हाल तर, शिवरायांचे नाव घेऊ नका. हा भगवा झेंडा हातात घेऊ नका. हे ढोंग महाराजांनासुद्धा आवडणार नाही. हे ढोंग तुम्हा मराठांच्या रक्तामध्ये असता कामा नये याची काळजी घ्या. पण शिवसेना म्हणून लोक तुमच्याकडे लोक आदराने पाहतायत तर तो आदर असाच ठेवा.” शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षातील सर्व सुत्रे आता शिंदे गटाकडे गेले आहेत. त्यावरूनच अरविंद सावंत यांनी त्यांना टोला लगावला आहे.

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले; स्वराज्य स्वप्न तव साकारिले;
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा; शिवराया, तुज मानाचा मुजरा.!🙏
महाराजाधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांना शिवजयंतीनिमित्त त्रिवार वंदन! तमाम शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!, असं कॅप्शनही अरविंद सावंत यांनी दिलं आहे.


गेल्या आठ महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाचा पाठिंबा काढून घेतल्याने ठाकरे सरकार कोसळले. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने ठाकरे गटाच्या हातून शिवसेनेचे सर्व हक्क गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. यावरून खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे.