विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावललं

10 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार आहे. पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित करण्यात आली आहेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजप नेत्या पंकजा मुंडेंना डावलण्यात आले आहेत. 10 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार आहे.

पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपनं पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं बुधवारी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची नावं जाहीर केलीत. पंकजा मुंडे या विधान परिषद उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून चित्र वाघ यासुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तुडून पडत होत्या. त्यामुळेच त्यांनासुद्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. पण या दोघींनाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं डावललंय.

दुसरीकडे राम शिंदे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपनं निर्णय घेतला आहे.
तर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलून उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या उमेदवारांना विधान परिषदेवर पाठवण्याचं भाजपनं ठरवलंय.

उमा खापरे या पिंपरी चिंचवडच्या असून, त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविकेचं पदही भूषवलं आहे. तसेच त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या मुंडे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांचे ओएसडी होते.

राज्य विधान परिषदेचे हे 10 सदस्य 7 जुलैला निवृत्त होणार

भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवंगत रामनिवास सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे 7 जुलैला निवृत्त होणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपालांच्या नियुक्तीच्या 12 आमदारांच्या यादीत रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंचे नाव होते. आता रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अमरसिंह पंडित यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्याचवेळी विरोधी भाजपचे सहा सदस्य निवृत्त होणार आहेत. राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात भाजपच्या पाचव्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल, असा प्रस्ताव सत्ताधारी MVA ने मांडला होता, परंतु भाजपने त्यास नकार दिला.


हेही वाचाः इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर, ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण