घरमहाराष्ट्रभाजप-महाविकास आघाडीचं ठरलं! चार जागा बिनविरोध तर दोन जागांवर होणार लढत

भाजप-महाविकास आघाडीचं ठरलं! चार जागा बिनविरोध तर दोन जागांवर होणार लढत

Subscribe

मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबारमध्ये साटंलोटं! नागपूर आणि अकोल्यात मात्र लढत

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होणार आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातील ६ विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरु होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे प्रयत्न मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये फळाला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ठरलं असून चार जागांवर बिनविरोध तर दोन जागांवर निवडणूक होणार आहे.

मुंबईच्या दोन जागा, कोल्हापूरची एक, धुळे-नंदुरबार एक, अकोला-वाशिम-बुलढाणा एक आणि नागपूरमध्ये एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यापैकी मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार आहे. मुंबईत दोन जागांसाठी तीन उमेदवारांनी अर्ज भरले होते. यात शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे, भाजपकडून राजहंस सिंह आणि अपक्ष म्हणून सुरेश कोपरकर यांनी अर्ज भरला होता. मात्र, सुरेश कोपरकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. यामुळे मुंबईतून सुनील शिंदे आणि राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

धुळे- नंदुरबार विधान परिषद जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासह अन्य चौघांनी माघार घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड झाली. तसंच, शुक्रवारी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोल्हापुरची निवडणूक ही खर्चिक निवडणूक होणार होती.

नागपूरमध्ये काँग्रेस-भाजप आमनेसामने

नागपूरमध्ये भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून छोटू भोयर हे मैदानात आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटू भोयर हे भाजपमधून नाराज होऊन काँग्रेसमध्ये आलेले आहेत. छोटू भोयर यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराज आहेत. नागपूरमध्ये भाजपकडे पुरेसं संख्याबळ असलं तरी छोटू भोयर हे अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे ही लढत नक्कीच रंगतदार ठरेल. दरम्यान, नागपूरसाठी भाजपकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही. या निवडणुकीत कुणाकडे किती नंबर याला काही महत्व नसतं. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

अकोल्यात वंचित ठरणार निर्णायक

अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल आमनेसामने आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -