घरताज्या घडामोडीLoksabha 2024 : एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून...; विजय शिवतारे लवकरच...

Loksabha 2024 : एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून…; विजय शिवतारे लवकरच करणार मोठी घोषणा

Subscribe

पुणे – लोकसभेचे बिगुल वाजले आहे. भाजप आणि काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे दावे-प्रतिदावे सुरु आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. दुसरीकडे पवारांचे पारंपरिक विरोधक विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महायुतीत अडचण होऊ नये यासाठी शिवसेनेतूनही बाहेर पडण्याची तयारी विजय शिवतारेंनी दाखवली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी परवाच या संबंधीचे विधान केले होते. बारामती मतदारसंघ अजित पवारांना सोडल्याचे ते म्हणाले होते. शरद पवारांना पराभूत करण्याची ही मोठी संधी चालून आली आहे, ती आम्ही गमावणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवारांना देण्याचे महायुतीत निश्चित आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे येथून निवडणूक लढण्यावर अडून आहेत.

- Advertisement -

बारामतीमध्ये बिहार सारखी परिस्थिती

विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतलेली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. बारामतीमध्ये बिहार सारखी परिस्थिती आहे. पवार कुटुंबाने त्यांचे एकछत्री अंमल बारामतीत चालवले आहे, त्याला बारामतीकर त्रस्त झाले आहेत. त्यांना बदल हवा आहे, असा दावा विजय शिवतारे करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीत तणाव निर्माण होत आहे. अजित पवार गट आणि शिवतारे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना मुंबईला बोलावून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उमेदवारी आणि पवार विरोधामुळे महायुतीत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र शिवतारे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माझ्यामुळे एकनाथ शिंदेंची अडचण होत असेल, तर मी शिवसेना सोडायलाही तयार आहे, असे विधान शिवतारेंनी केले आहे. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा : Amit Shah : …तर आपल्याला जय गुजरात घोषणा देण्याची सक्ती; अभिनेत्याची अजितदादा, उदयनराजेंबद्दलची पोस्ट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -