Homeमहाराष्ट्रVijay Wadettivar : राऊतांचे विधान नैराश्यातून...; असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

Vijay Wadettivar : राऊतांचे विधान नैराश्यातून…; असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

Subscribe

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष हे स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकींकडे लागले आहे. अशामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाला चलो रेचे संकेत दिले आहेत. अशामध्ये शिवसेना उबाठा कोणासोबतही युती करणार की नाही? यावर आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. (Vijay Wadettivar congress on sanjay raut shivsena ubt statement on mnc elections)

हेही वाचा : Vijay Wadettiwar : भाजपला फोडाफोडी केल्याशिवाय चैन पडत नाही; वडेट्टीवरांनी केले हे आरोप 

शुक्रवारी (13 डिसेंबर) काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांच्या विधानावर मोठे विधान केले. “जय पराजय होत असतो खचून जाण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्या देहबोलीतून नैराश्य दिसत आहे. या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, विचारधारा स्वतंत्र आहे, तो त्यांचा अधिकार आहे.” असे ते म्हणाले. तसेच, आम्ही आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी तयार आहोत. पण संजय राऊत यांच्या भूमिकेसंदर्भात स्पष्टता आली की आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

शुक्रवारीच शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “शिवसेनेने इतर स्थानिक स्वराज्य संस्था या कधीच युती किंवा आघाडीत लढलेल्या नाहीत. आमचा कोणताही निर्णय घेताना आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊनच निर्णय घेऊ. काहीही निर्णय असला तरी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र बसूनच निर्णय घेतील,” असे म्हणत त्यांनी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरून आता विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आल्यानंतर इतर महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांच्या विधानावर काय बोलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav