मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश हा ओबीसीमध्ये करून घेण्यात यावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून थेट विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट केले तर याचा फायदा कोणालाही होणार नाही. तर या मागणीविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा आता ओबीसी नेत्यांकडून देण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून मराठा समाजाच्या तरुणाला आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा तरुणांनी नीट अभ्यास करावा आणि नेमकी कोणाला साथ द्यावी, याचाही विचार करावा, असेही वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Vijay Wadettivar’s appeal to the youth of the Maratha community)
हेही वाचा – मनोज जरांगेंचा खटाटोप राजकीय फायद्यासाठी, विजय वडेट्टीवारांचा थेट आरोप
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा तरुणांचे मनोज जरांगे यांच्या जिद्दीपायी प्रचंड नुकसान होणार आहे. त्यांनी याबाबतचा नीट अभ्यास करावा. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावर मराठा तरुणांनी सगळे काही ठरवू नये, असे आवाहनी विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आले आहे. ओबीसींच्या 374 जातींमध्ये येऊन मराठ्यांना फार काही फायदा होणार नाही, तर ओपनमध्येही फार काही फायदा होणार नाही. म्हणजेच नोकऱ्यांचा किंवा सवलतींचा जिथे संदर्भ येतो तिथे फार मोठे नुकसान हे मराठा तरुणांचे होणार आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून, थोडा विचार करून आपले हित कशामध्ये आहे, आपण कोणाला साथ द्यावी, याचा विचार करावा, असेही वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, ज्याप्रमाणे बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात आली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवावी, त्यामधून इतर समाजाच्या आशा, आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. कारण EWS त्यासाठीच तयार करण्यात आले होते.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर दोन वर्ष हे प्रकरण शांत झाले होते. पण आता आंदोलनावर गोळीबार झाल्यानंतर जरांगे पाटील हे मराठा समाजाचे हीरो म्हणून पुढे आले. त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हम झुका सकते है, असा त्यांचा गर्व झाला आहे. ज्यामुळे आता ते सरकारला धमक्या देत आहेत. आम्हालाही रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा धमक्या देत आहेत. मुळात धमक्या देऊन प्रश्न सुटणार आहेत का? कोणत्याही गोष्टी करायच्या आहेत. त्या कायद्याच्या चौकटीत राहून कराव्या लागतात. परंतु, सध्या त्यांच्या डोक्यात वेगळेच खूळ घुसले असल्याने ते ओबीसीची जिद्द करून आहेत. तर आता ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यावरून सगळ्यांनाच कुणबी लावून टाका. गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी असे सगळ्यांनाच कुणबी लावून प्रमाणपत्र देऊन टाका आणि मोकळे करून टाका, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.