मुंबई : आज (ता. 14 सप्टेंबर) अखेरीस 17 व्या दिवशी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुटलेले आहे. परंतु असे असले तरी त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांचे उपोषण सोडले. तर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले. एकीकडे मराठा समाजाची समजूत काढण्यात राज्य सरकारला यश आलेले असताना दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आवाहन केले आहे. (Vijay Wadettiwar appealed to Chief Minister Eknath Shinde for OBC community)
हेही वाचा – मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नका, 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही – नारायण राणे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याबाबत बोलताना म्हणाले की, उशीर केला पण उपोषण सुटले याचा आनंद आहे, देर आये दुरुस्त आये. मात्र आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे या समाजाला आश्वस्त करण्याची सुद्धा गरज आहे. तसेच, जिथे ओबीसी तरुण उपोषणाला बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावे आणि उपोषण सोडवावे, असे आवाहन वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आले आहे. जागोजागी जावून उपोषण सोडवणे आणि आंदोलन थांबवणे हेच काम सरकरच राहिले आहे, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात काय चर्चा झाली हे माहित नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाज विरोध करत नाही. मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. आता दीड वर्ष झाले आहे. निवडणुकीला आता काही 8 महिनेच शिल्लक आहे. त्याआधी आरक्षण देतात की, पुन्हा पाने पुसतात, हे पाहावे लागेल, असेही विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तर, ओबीसांना जे फायदे मिळत आहेत. ते समाजाला देत आहोत. काही त्रुटी आहेत, त्या दूर करत आहोत. जे आरक्षण दिले गेले ते आरक्षण मिळवून देण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहोत. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असतील, काहींकडे नसतील त्यांना न्याय देण्यासाठी जस्टीस शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. त्यांचे काम सुरू झाले आहे. एक बैठक झाली आहे. दुसरी सुरू आहे. मराठा समाज कसा आहे, त्याचे राहणीमान कसे आहे ते तपासले जात आहे. तुमचा माणूस सोबत दिला तर फायदाच होईल. तुम्ही वेळ दिला आहे ती चांगली गोष्ट आहे, असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्यात असताना म्हणाले आहेत.