Vijay Wadettiwar On Mahayuti मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी असलेली पीक विमा योजना विरोधकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका झाल्या मत मिळाली, आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार. शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे’, असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. (Vijay Wadettiwar On Mahayuti Government CM Ladki Bahin Yojana Farmer Crop Scheme)
विजय वडेट्टीवारांच्या एक्स पोस्टमध्ये काय लिहिलंय?
“निवडणुका झाल्या मत मिळाली, आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार…शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं ‘जाहीरनामा’ म्हणून जनतेसमोर ठेवली गेली, ती सर्व गाजरं होती, म्हणून आता अर्थमंत्र्यांच्या मते शेतकरी कर्जमाफी ‘तिजोरीवरचा भार’ ठरू शकते. आधी वचन देणे आणि नंतर निधीचे कारण देऊन ती पूर्ण न करणे हा जनतेचा विश्वासघात नाही का? शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि विश्वासाचे आदर करणारे हे सरकार नाही”, असे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात राबवत कोणतेही निकष न राबवता सर्व महिलांना देण्यात आली. मात्र निवडणुकीनंतर निकष लागू करत निकषाबाहेरील लाभार्थी महिलांना वगळण्यात येईल, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
‘लाडकी बहीण’ योजना घोषित झाल्यापासून या योजनेवर, योजनेतील त्रुटी, सरकारवर पडणारा ताण, यावर टीका टिप्पणी आणि वाद विवाद देखील सर्व स्तरावर पाहायला मिळाला. त्यात आता या योजनेतील निकष आणि महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडून योजनेतील निकषांबद्दल देण्यात येणाऱ्या माहितीवरून उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहेत.
हेही वाचा – Sharad Pawar : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया