Homeमहाराष्ट्रVijay Wadettiwar : ठाकरेंना विनंती करू, त्यांनी ऐकले तर ठीक अन्यथा...; राऊतांच्या...

Vijay Wadettiwar : ठाकरेंना विनंती करू, त्यांनी ऐकले तर ठीक अन्यथा…; राऊतांच्या विधानावर वडेट्टीवारांचे स्पष्ट मत

Subscribe

राऊतांनी आगामी महानगरपालिकांसाठी हा स्वबळाचा नारा दिला आहे. राऊतांच्या या विधानामुळे मविआत खळबळ उडाली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (ता. 11 जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मविआच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राऊतांनी केलेली घोषणा पक्षाची भूमिका असली तरी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतची चर्चा करू, असे वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Vijay Wadettiwar said let’s request Uddhav Thackeray After Sanjay Raut announcement)

खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, इंडि आघाडी ही आताही मजबूत आहे. दिल्लीत इंडि आघाडीला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. पण काल शुक्रवारी (ता. 10 जानेवारी) काही प्रसार माध्यमांनी आमच्या विधानाचा विपर्यास केला. मी म्हणालो होतो की, नाना पटोले, संजय राऊत आणि आम्ही इतर सर्व नेत्यांनी 20 दिवस बसून चर्चा केली होती. जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ 20 दिवस सुरू होते. ज्यामुळे आम्हाला मतदारसंघांमध्ये फिरण्याकरिता आणि प्लॅनींगकरिता वेळ मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला फटका बसला, असे मी म्हणालो. पण प्रसार माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा… मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार – राऊत

तर, काही माध्यमांनी माझ्या विधानाला चुकीच्या पद्धतीने दाखवत दोनच नेते (नाना पटोले, संजय राऊत) जबाबदार असल्याचे दाखवले. पण विषय असा आहे की, संजय राऊत हे मोठे नेते असल्याने त्यांनी केलेले विधान हे त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. तरी पण सुद्धा आम्ही एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढू. पण जर ते सोबत नाही आले तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. शरद पवार आणि आम्ही काँग्रेस आमची अनेक वर्षांची नैसर्गिक आघडी राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही दोघे आताही एकत्रित राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ज्यामुळे आता खरंच महाविकास आघाडीत फूट पडली असून ठाकरे गट याची अधिकृत घोषणा सुद्धा करणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.