मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीही चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा

अधिकाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी राज्य सरकारसह शरद पवारांवर विखे-पाटलांनी केला हल्लाबोल

radhakrishna vikhe patil

राहाता – स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना दोष देण्याचं काम महाविकास आघाडीचे मंत्री करताहेत. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमध्ये थोडीही चाड शिल्लक असेल तर त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत माजी मंत्री तथा भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता हल्लाबोल केला.

देशात १०० कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कॅबिनेट मंत्री सरकारी अधिकाऱ्याला धमक्या देतात, हे कधी ऐकलं नाही. तुमच्याकडे वेगळी आयुधं आहेत ना.. उच्च न्यायालयात जा.. तक्रार करा. मात्र, धमकीच्या अशा प्रकारामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेलाय. मंत्री धमक्या देत असताना त्यांचे नेते काय करतात, त्यांच्या पक्षातल्या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचा नायनाट करणार का, असा सवालही आमदार विखे-पाटलांनी शरद पवारांचं नाव न घेता केला.

एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून लवकरच सत्य बाहेर येईल. त्यावेळी यांना पळता भुई थोडी होईल, अशी टिकाही विखे-पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

राज्य सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे

जरा काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं. लसीकरण जास्त झालं तर स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, असा हा कारभार आहे. राज्य सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. साखर कारखान्यांबाबतही राज्य सरकार दुजाभाव करत आहे. विरोधकांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली जातेय. केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल. मात्र, राज्याची भूमिका त्यांनी जाहीर केली पाहिजे, असंही विखे-पाटीलांनी सांगितलं.