खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे – विक्रम गोखले

Vikram Gokhale said I am against false secularism
खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे - विक्रम गोखले

भारत हे हिंदू बहुल राष्ट्र आहे. या राष्ट्राने तथाकथित धर्मनिरपेक्षता, सेक्युलॅरिझम जोपासण्याचे नाटक केले आहे. खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे, असे परखड मत अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. स्वातंत्र्याबद्दलच्या कंगना राणावत हिच्या वक्तव्याचं समर्थन केल्यामुळे वादात अडकलेले अभिनेते विक्रम गोखले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इतिहासातील दाखले देतानाच देशातील सद्य परिस्थितीवरही आपली मते व्यक्त केली.

काही राजकीय पक्षांत चांगली माणसं आहेत. त्याबद्दल मी चांगलेच बोलतो. जे चांगले ते चांगले. वाईट फेकून द्या अशा मताचा मी आहे. या देशाचे तुकडेच झाले पाहिजेत. इथे कम्युनिझम आले पाहिजे अशी काही लोकांची सुप्त इच्छा आहे. याला माझा विरोध आहे. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे ही माझी इच्छा आहे. त्यांची गरज आहे. स्युडो सेक्युलॅरिझमला त्याची भीती वाटते, असे गोखले म्हणाले.

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र यायला हवेत, असे मत गोखले यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले. खोट्या धर्मनिरपेक्षतेला माझा विरोध आहे. मी धिक्कार करतो. माझा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटते की मी ठराविक लोकांच्या बाजूने बोलतो. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलतो, असे गोखले म्हणाले. जो धर्म शिरच्छेद करा असे शिकवतो, तो धर्म गेली दीड हजार वर्षे इथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण कार्यरत आहेत. पण, सत्तेची भूक लागलेले जे राजकीय नेते किंवा पक्ष आहेत. त्यांना हा देश एकसंध राहावा हे सहन होत नाही. अमेरिकेने ज्यांना व्हिसा नाकारला, त्यांचा सन्मान होतोय हे त्यांना पाहवत नाही. एक माणूस, एक पक्ष काही तरी करतोय म्हटल्यावर तो लोकप्रिय होणारच. आमचे काय होईल असे वाटून इतर भुंकायला सुरुवात करतात, असे म्हणत, विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे कौतुक केले. १९६२ चा भारत आज राहिलेला नाही. आजच्या भारतसमोर शत्रू थांबतो. या शत्रूंशी संबंधित काही राजकीय पक्षांचे नेते आहेत, असा आरोपही त्यांनी केला.