Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र विलेपार्ल्यात उद्या 'आठवणीतले विक्रमकाका', मान्यवर जागविणार विक्रम गोखलेंच्या स्मृती

विलेपार्ल्यात उद्या ‘आठवणीतले विक्रमकाका’, मान्यवर जागविणार विक्रम गोखलेंच्या स्मृती

Subscribe

मुंबई : मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे अल्पशा आजाराने गेल्या शनिवारी निधन झाले. विलेपार्लेमध्ये उद्या, रविवारी ‘आठवणीतले विक्रमकाका’ या श्रद्धांजली सभेचे आयोजिन करण्यात आले असून त्यात विविध मान्यवर विक्रम गोखले यांच्या स्मृती जागविणार आहेत.

अष्टपैलू अभिनेते, संवेदनशील समाजव्रती आणि ‘क्वीन्स मेरी’ अपंग पुनर्वसन केंद्रामधील जवानांसाठीच्या कल्याणकारी योजनांचे प्रणेते विक्रम गोखले गेल्या अनेक दशकांपासून नाटक आणि चित्रपटक्षेत्रात कार्यरत होते. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळाले. विक्रम गोखले यांनी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. गोरा वर्ण, देखणं ऐटदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे समोरच्यावर त्यांची सहज छाप पडत असे.

- Advertisement -

विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणावर उद्या, रविवारी सायंकाळी 6 वाजता ‘आठवणीतले विक्रमकाका’ या शीर्षकांतर्गत एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रम गोखले मित्र परिवार, पार्ले महोत्सव परिवार, लोकमान्य सेवा संघ व जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ या संस्थाच्या वतीने आयोजिलेल्या या श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातील त्यांच्याशी जवळीक असणाऱ्या मान्यवरांकडून विक्रमकाकांच्या संस्मरणीय स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.

या प्रसंगी भरत दाभोळकर, किरण कुमार, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, सचिन खेडेकर, विजय केंकरे, जितेंद्र जोशी, श्रीराम दांडेकर, विक्रम वाटवे इत्यादी विक्रम गोखले यांच्या आठवणी जागविणार असल्याचे आयोजकांच्या वतीने आमदार पराग अळवणी यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -