घरCORONA UPDATECoronavirus: ...म्हणून ग्रामस्थांनी गाव सोडून थाटला रानामध्ये संसार

Coronavirus: …म्हणून ग्रामस्थांनी गाव सोडून थाटला रानामध्ये संसार

Subscribe

सतरा लोक बाहेरुन आल्याने गावात भीतीचं वातावरण आहे.

करोनाच्या महामारीपुढे अवघे जग हतबल असताना अकोल्याच्या साम्रद गावच्या चराचीवाडीत एक-दोन नव्हे तर तब्बल सतरा लोक बाहेरुन आले, आणि आख्खी वाडी हादरून गेली. गावातील लोकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तपासणी करून घेण्याचा आग्रह धरला. मात्र ते कोणाचेच ऐकेनात, त्यांच्यापुढे हतबल झालेल्या ग्रामस्थांनीच वाडी सोडली आणि रानात जाऊन आपला संसार थाटला. देशातील सर्वात जास्त बाधित रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी मुंबई-पुणे आदि मोठ्या शहरातून सतरा लोक अकोले तालुक्यातील साम्रद गावच्या चराचीवाडी येथे आले आहेत. नोकरी निमित्ताने हे सर्व बाहेरगावी असतात.

गावात आलेल्या या पाहुण्यांना आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी हा सल्ला साफ धुडकावत तपासणी करून घेण्यास नकार दिला. गावात आलेले लोक कोणाचेच ऐकत नाही हे पाहून गावातील आशा सेविका, सरपंच यांनी याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी व प्रशासनाला दिली.

- Advertisement -

सतरापैकी काही लोकांना ताप व खोकला आहे. त्यामुळे वाडीत भितीचे वातावरण पसरले आहे. गावात आलेल्या या सतरा जणांना तपासणीसाठी आरोग्य विभागाने बोलविले. मात्र तरीदेखील त्यांनी आरोग्य विभागाच्या आदेशाला न जुमानता गावातच राहणे पसंत केले. त्यामुळे हतबल झालेल्या वाडीतील ग्रामस्थांनी वाडीच सोडायचा निर्णय घेत वाडीबाहेर लांब शेतात संसार थाटला. शेतातच त्यांनी पाल ठोकत तेथेच मुक्काम ठोकला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी वाडीमध्ये येत केली तपासणी दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच अकोले तालुक्यातील शेंडी येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाडीत जाऊन या सर्वांची तपासणी केली. संबंधितांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या सर्वांना लक्षणे दिसत नसली तरी शेंडी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवा, त्यांना बरे होईपर्यंत गावात पाठवू नका, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. ग्रामस्थांच्या आग्रहासमोर हतबल झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो अशी समजूत काढत माघारी फिरले.

- Advertisement -

हेही वाचा – वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी केडीएमसीची हेल्पलाईन; आवश्यक वस्तू मिळणार घरपोच

यासंदर्भात साम्रद येथून फोन आले होते. मी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. अशाप्रकारचे रुग्ण जर खरेच असतील तर १०८ क्रमांकाला फोन करून रुग्णाला रुग्णवाहिकेतून हलविता येईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

सर्वांना होम क्वारंटाईनचे आदेश

साम्रद येथील रुग्णाला तापसण्यासाठी पथक गेले आहे, मात्र तसा प्रकार नसावा. याबाबत मी स्वतः जाऊन खात्री करतो, मात्र संबंधित रुग्णाला सध्या तरी होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली.

ग्रामस्थ अद्यापही भयभीत

गावात आलेल्या सतरा जणांपैकी पुण्याहून आलेला एक जण तापाने फणफणला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा ताप करोनाचा नसल्याचे सांगितले. मात्र तो पूर्णतः बरा होईपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात ठेवावे, अशी ग्रामस्थांची इच्छा असून या भीतीने अद्यापही ग्रामस्थ वस्तीवर राहत आहेत, अशी माहिती सरपंच चंद्रप्रभा बांडे यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -