घरमहाराष्ट्रवांद्रे स्टेशनजवळील परप्रांतीय मजूर गर्दीप्रकरणी विनय दुबे, राहुल कुलकर्णीला अटक

वांद्रे स्टेशनजवळील परप्रांतीय मजूर गर्दीप्रकरणी विनय दुबे, राहुल कुलकर्णीला अटक

Subscribe

लॉकडाऊनच्या मुदत 3 मेपर्यंत वाढवल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच आपल्या गावी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर मंगळवारी संध्याकाळी जमावबंदीचा आदेश धुडकावून वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ गोळा झाले होते. याप्रकरणी एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीचे उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी आणि उत्तर भारतीय संघटनेचा नेता विनय दुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी विनय दुबेला वांद्रे स्थानिक कोर्टाने २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पत्रकार राहुल कुलकर्णी यांना गुरुवारी कोर्टात हजर केले जाईल.तसेच वांद्रे स्टेशनजवळील गर्दी जमा केल्याप्रकरणी १३० जणांचे सोशल मीडिया अकाऊंट ओळखले असून त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ते रोखण्यासाठी संपूर्ण देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला ३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आपआपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक असलेले हजारो मजूर मंगळवारी 14 एप्रिलला संध्याकाळी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एकत्र आले. इतकी गर्दी अचानक जमा झाल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होताच पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित 800 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

- Advertisement -

उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे यांनी फेसबुकच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने व्यवस्था करण्याची मागणी करुन शासनाच्या कारभारावर टिका केली. इतकेच नव्हे तर राज्य शासनाने या कामगारांना त्यांच्या गावी पाठविले नाहीतर 18 एप्रिलनंतर आपण ही सुविधा उपलब्ध करु देऊ असे वादग्रस्त वक्तव्य करुन आंदोलनाची भूमिका मांडली होती. त्यामुळे विनय दुबे यांच्याविरुद्ध पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच मंगळवारी रात्री उशिरा विनय दुबे यांना त्यांच्या नवी मुंबईतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना कोर्टाने मंगळवार 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

विनय दुबे प्रमाणेच अफवा पसरवण्याबाबत एबीपी माझाचे उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतिय कामगारांसाठी रेल्वे प्रशासन जनसाधारण विशेष ट्रेनची सेवा सुरु करणार असल्याचे बेजबाबदार वृत्त काल मंगळवारी सकाळी देऊन त्यांनी अफवा पसरवली आणि वांद्रे येथील गर्दी जमा होण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. या वृत्ताबाबत त्यांनी कुठल्याही रेल्वेच्या अधिकार्‍यांची प्रतिक्रिया घेतली नाही, केवळ एका पत्राचा उल्लेख करुन त्यांनी ही माहिती दिली होती. या माहितीमुळे संबंधित कामगार वांद्रे येथे जमा झाले होते.

मात्र रेल्वेने अशी कुठलीही ट्रेन सुरु होणार नाही. 3 मेपर्यंत रेल्वे प्रशासन अशा कुठल्याही ट्रेन सुविधा उपलब्ध करणार नाही असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे खोडसाळ वृत्त दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक मंगळवारी रात्री उशिरा उस्मानाबाद येथे गेले होते. बुधवारी सकाळी राहुल कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

अफवा पसरवणार्‍या ३० अकाऊंटवर कारवाई
वांद्रे जमावाला कारणीभूत ठरणारी आणखी 30 सोशल मीडिया अकाऊंट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शोधली आहेत. या 30 सोशल मीडिया अकाऊंटवरून रेल्वे सेवेबद्दल अफवा पसरवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकार्‍यांना या 30 अकाऊंट होल्डर्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 30 अकाऊंटमध्ये एका वृत्तवाहिनीचासुद्धा समावेश असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -