राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ येणे दुर्दैव! – राऊत

vinayak raut and narayan rane kokan
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिंधुदुर्गातील राज्यसभा खासदार नारायण राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याने पुन्हा एकदा शिवसेना-राणे संघर्ष सुरू झाला आहे. नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंना लोकसभा निवडणुकीत पाडणार्‍या खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

अमित शहा सिंधुदुर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेने आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नगरपरिषदेचे 7 नगरसेवक फोडले आहेत. हे नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे हार, गुच्छ घेणार नसल्याने हे नगरसेवक व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. आता नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्यावरून चर्चा जोर धरू लागली आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे.

शिवसेनेचे पाच पट नगरसेवक फोडणार
वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र, सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याचदरम्यान भाजपाने शिवसेनेला देखील आता इशारा दिला आहे. आमचे जेवढे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.