जबरदस्तीने प्रकल्प राबवलात तर… विनायक राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

सध्या राज्यात शिंदे सरकार विरुद्ध ठाकरे गट हे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. पण ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी थेट रिफायनरी प्रकल्पावरून शिंदे सरकारला स्वतःवर गोळी झेलण्याचा इशारा दिला आहे. 

संग्रहित छायाचित्र

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी येथील हातीस या ठिकाणी सुरु असलेल्या पीर बाबा शेख यांच्या उरुसाला उपस्थित राहिले होते. याठिकाणी त्यांनी पीर बाबा शेखच्या उरुसाचे दर्शन घेतल्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. ‘लोकसभा मतदारसंघातील सर्वांची सेवा करण्याची जी संधी दिली, जी सद्बुद्धी दिली, अशीच सद्बुद्धी पुढे दे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे,’ अशी प्रार्थना केल्याचे राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले.

यावेळी विनायक राऊत यांनी रत्नागिरीत होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले. राऊत म्हणाले की, ‘रिफायनरी प्रकल्प राबवताना तेथील लोकांना गोळ्या घालून आणि मुडदे पाडून जबरदस्तीने प्रकल्प करत असाल तर त्याला आम्ही पण ठामपणे विरोध करू. कारण सरकारचे कर्तव्य आहे की, जर तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आणत असाल तर त्या गावातील लोकांशी संवाद साधा. तो प्रकल्प किती चांगला आहे, ते तेथील लोकांना पटवून द्या. पण लोकांची समजूत न काढता उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम हे सरकार करत आहे. तर जबरदस्तीने प्रकल्प राबवलात तर विनायक राऊत पहिली गोळी झेलायला तयार आहे,’ असे म्हणतं राऊतांनी शिंदे सरकारला रिफायनरी प्रकल्पाबाबत थेट इशारा दिला आहे.

यावेळी विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांचा सुद्धा समाचार घेतला. ‘दीपक केसरकर सारख्या उपटसुंभ्याला जास्त किंमत देत नाही. कालचा आलेला उपरा आज आम्हाला शहाणपण शिकवतोय. जे काय करायचे ते आमच्या पक्षप्रमुखांना चांगले समजते,’ असे राऊत म्हणाले.

हेही वाचा – विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणीचा पेच? राज्यमंत्री नसल्याने सरकारची अडचण

दरम्यान, विनायक राऊत यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत देखील मोठे वक्तव्य केले आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही विधानसभेत होणाऱ्या पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्यात यासाठी शिंदे-भाजप सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नेहमीप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना या निवडणुका बिनविरोध होण्यासाठीचे पत्र लिहिले आहे. त्यामुळे याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘राज ठाकरे यांच्या पत्रावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नक्की भूमिका घेतील. तसंच ते सहानुभूतीपूर्व विचार नक्की करतील. पुढे अडथळा निर्माण होईल असे वाटत नाही.’