मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मराठी पाट्यासंदर्भात दिलेल्या महत्वपूर्ण निकालानंतर मराठीचा मुद्दा पुन्हा चर्चील्या जात आहे. अशातच मुलुंडमधून मात्र, एक धक्कादायक माहिती समोर आली. मराठी कुटुंबाला सोसायटीत परवानगी नाही असे फर्मान सोडणाऱ्यास मनसेने चांगलाच धडा शिकवत त्याच्याकडून माफीही मागून घेतली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर घडला.(Viral video of Marathi man refusing to give house Lesson learned by MNS)
तृप्ती देवरूखकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये मुलुंड वेस्टमध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर मराठी असल्याचे सांगत घर नाकारल्याचा आरोप त्यांनी केला त्या व्हिडीओमध्ये केला होता. तसेच आपला हात पकडला आणि पतीला धक्काबुक्की केल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला आलेल्या अनुभवानंतर मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षांनी ते बंद करावं, शिवाजी महाराजांचं नावही घ्यायचं बंद करावं असं म्हणत तृप्ती देवरूखकर यांनी संताप व्यक्त केला होता. या व्हिडीओची दखल मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट मुलुंड गाठले.
हेही वाचा : दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी- रामदास आठवले
मनसे पदाधिकाऱ्यांनी मागायला लावली माफी
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी थेट मुलुंड वेस्ट गाठले. मुलुंड वेस्टमध्ये मराठी माणसाला घरं देणार नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी हिसका दाखवत धडा शिकवला. त्या व्यक्तीला थेट माफी मागायला लावली असून, यापुढे असा प्रकार होणार नाही असेही वदवून घेतले.
हेही वाचा : Old Pension Scheme : ‘रामलिला’तून घुमणार जुन्या पेन्शन योजनेचा आवाज; सकारी कर्मचारी दिल्लीकडे
असा व्यक्त केला होता व्हिडीओमधून संताप
जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील? अशा आशयाचा व्हिडीओ तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित व्यक्तीची कानउघडणी केली.