विरारची दुर्घटना राष्ट्रीय विषय नाही, राजेश टोपे यांचे बेजबाबदार वक्तव्य

Virar Covid Hospital Fire Not national news Rajesh Tope's irresponsible statement
विरारची दुर्घटना राष्ट्रीय विषय नाही, राजेश टोपे यांचे बेजबाबदार वक्तव्य

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाही, असं बेजबाबदार वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. कोविड रुग्णालयाच्या ICU वॉर्डला लागलेल्या आगीत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला तर ८ पुरुषांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

विरारच्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. राज्य सरकार पातळीवर ही कारवाई केली जाईल. ही राष्ट्रीय बातमी नाही. राज्य सरकार रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी सर्व पावले उचलत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना सरकार ५ लाख रुपयांची मदत करणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

आम्ही चौकशीची घोषणा केली असून दहा दिवसांत अहवाल सादर केला जाईल. अग्निशमन, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही अशा जबाबदार लोकांवर कारवाई केली जाईल, असं टोपेंनी सांगितलं.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांना प्रत्येकी २ लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे.