Verginity Test : डॉक्टर वधूची बहुचर्चित कौमार्य चाचणी अखेर थांबली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना पोलिसांच्या मदतीने यश

virginity test
कौमार्य चाचणी

नाशिक – त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये उच्च शिक्षित वधू-वराचा विवाह सोहळा आज सायंकाळी पार पडला. जात पंचायतच्या पंचांकडून डॉक्टर असलेल्या नववधूची लग्नानंतर कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबचा तक्रार अर्ज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस प्राप्त झाला होता. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला. दरम्यान, असा कुठलाही प्रकार होणार नव्हता, असे जात पंचायतीकडून सांगण्यात आले. त्यावर त्यांच्याकडून तसे लेखी लिहून घेण्यात आले.

अंनिसने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विनंती अर्ज देऊन अशी कुप्रथा थांबवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी संबंधित हॉटेल मालकाला नोटीस बजावली. काही अनुचित प्रकार झाल्यास हॉटेल मालकाला जबाबदार ठरविण्यात येईल, असे नोटीसमधून कळवले गेले होते. त्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे सहकार्‍यांसमवेत विवाहस्थळी दाखल झाले. कौमार्य चाचणीबाबत त्यांनी शहानिशा करून, संबंधितांचे जबाब घेतल्याचे समजते. अशी काही परीक्षा होत नाही,असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते. जात पंचायतींच्या पंचांनी कानावर हात ठेवून अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचेही समजते.

मात्र, या समाजातील अनेक बांधवांच्या यासंदर्भात तक्रारी आहेत. जातपंचायतीच्या दबावामुळे अनेकजण समोर येत नाहीत. मात्र, महाराष्ट्र अंनिस अशा पीडितांना पुन्हा आवाहन करून हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. संघटनेच्या वतीने पोलिसांचे आभार मानण्यात आले. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनीही कृतीशील हस्तक्षेप करत पोलिसांना सुचना केल्या. मोहिमेत डॉ. टी.आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, अ‍ॅड. समीर शिंदे, नितीन बागूल, महेंद्र दातरंगे, कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले. हा अंनिसच्या जात पंचायतविरोधी लढ्याचा विजय असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काय असते कौमार्य परीक्षा?

आजही एका समाजात लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. जातपंचांनी दिलेल्या पांढर्या शुभ्र वस्त्रावर वर व वधू यांनी झोपायचे असते. त्यावर रक्ताचा लाल डाग पडला तरच, ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा ते लग्न अमान्य करून, अशा वधूस मारहाण करून, तिच्या पालकांना शिक्षा व जबर आर्थिक दंड केला जातो. दंडाची रक्कम न भरल्यास तिच्या परिवाराला वाळीत टाकले जाते. राज्य सरकार कडून अशा कुप्रथा थांबविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतू परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या चारित्र्यावर गदा येत आहे व मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे.