राज्यपाल गिरवताहेत मराठीचे धडे

सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये केंद्रस्थानी आहेत ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. अनेक राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांच्या भेटीगाठी, नियोजित कार्यक्रम या सगळ्या व्यस्त दिनक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वेळ काढून मराठी भाषा शिकत आहेत. मराठी अवगत करण्यासाठी वृत्तपत्रे, मराठी पुस्तके वाचनासाठी राज्यपाल रोज विशेष वेळ देतात.

सप्टेंबरमध्ये राज्यपाल पदाची शपथ घेतल्यापासून मराठी भाषा शिकण्यास राज्यपालांनी प्राधान्य दिले आहे. दररोज सकाळी वृत्तपत्रे वाचताना ते मराठी वृत्तपत्रांना प्राधान्य देत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या प्रश्नांकडे राज्यपाल विशेष लक्ष देत आहेत. अनेक मोठी वृत्तपत्रे ही बारकाईने राज्यातील विषयांची मांडणी वृत्तपत्रात करत नाहीत. तुलनेत मराठी वृत्तपत्रात स्थानिक विषयांचे वार्तांकन चांगल्या पद्धतीने होत असल्यानेच राज्यपालांनी मराठी शिकण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मराठी वाचण्यासाठी सध्या ते प्रयत्न करत आहेत. मराठी भाषा त्यांना काही अंशी समजते. याआधी नागपुरात काही काळ त्यांनी सामाजिक काम केले आहे.

त्यामुळेच मराठी भाषेची त्यांनी समज चांगली आहे. सध्याच्या रोजच्या दिनक्रमात मराठी वृत्तपत्र वाचनासाठी ते मेहनत घेत आहेत. राज्यातील अनेक भागात काम करताना मराठी भाषेचा अडथळा नको म्हणून राज्यपालांकडून हे प्रयत्न सुरू आहेत. तसेच राज्यपालांनी काही मराठी पुस्तकांचेही वाचन सुरू केले असल्याचे समजते.

दररोज विक्रमी भेटीगाठी
या आधीचे राज्यपाल दिवसाला कमाल ३ ते ४ जणांच्या भेटीगाठी घ्यायचे. पण नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेटीगाठी घेण्याचा नवा विक्रम केला आहे. दररोज ते सरासरी ४० लोकांना भेटतात. त्यामध्ये सर्वसामान्यांपासून ते व्हीव्हीआयपी, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही असतात. सर्वसामान्यांमधील राज्यपाल ही नवीन ओळख या राज्यपालांच्या निमित्ताने निर्माण होत आहेत. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी ३५ कार्यक्रमांना हजेरी लावली आहे हे विशेष.