विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले, 10 जागांसाठी 20 जूनला मतदान

यासंदर्भातील अधिसूचना २ जूनला जाहीर होईल. उमेदवारांना ९ जूनपासून अर्ज दाखल करता येतील आणि 20 जूनला मतदान होईल.

Voting

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांसाठी बुधवारी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 13, महाराष्ट्रातील 10 आणि बिहारमधील 7 जागांचा समावेश आहे.

यासंदर्भातील अधिसूचना २ जूनला जाहीर होईल. उमेदवारांना ९ जूनपासून अर्ज दाखल करता येतील आणि 20 जूनला मतदान होईल. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणूक लागल्याने राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दौंड, सुजितसिंह ठाकूर आणि भाजप नेते प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होणार आहेत, तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. २२ जुलै रोजी या आमदारांची मुदत संपत आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असून यंदा भाजपचे दोन सदस्य कमी होणार असल्याने भाजपकडून कुणाला संधी मिळणार आणि कुणाची संधी हुकणार याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे.

इतक्या मतांची आवश्यकता
विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्षांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके आहे. संख्याबळाच्या हिशोबाने भाजपच्या 4 जागा निवडून येऊ शकतील, तर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसचे 45 आमदार आहेत. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो.