अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान, मुंबई महापालिका निवडणुकीचा ट्रेलर

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या 3 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय ज्वर चढत असतानाच ही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा हा ट्रेलर ठरणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर 2022रोजी लागणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 1997मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले होते. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर पुढच्याच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते. मात्र, आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तिथेच 11 मे 2022 रोजी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2022 ही शेवटची तारीख असून 15 ऑक्टोबर 2022 रोजी अर्जांची छाननी होईल. 17 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर, 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाची साथ मिळाली आहे. त्यातच आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणून जाहीर झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या दसऱ्या मेळाव्याला वेगळी धार चढण्याची शक्यता आहे.

या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपाने आपापले उमदेवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणार असून त्यांच्याविरोधात भाजपाचे मुरजी पटेल असतील. ही जागा शिंदे गटाकडे जाणार होती, पण ती आता भाजपाने घेतल्याने शिंदे गटही त्यांच्यामागे पूर्ण ताकद लावेल, हे निश्चित. तर, राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पाठीशी उभी राहू शकते. मात्र या परिस्थितीत काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ही पोटनिवडणूक म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीचा ट्रेलर असेल.

अन्य 5 राज्यांमध्येही पोटनिवडणूक
महाराष्ट्राबरोबरच बिहारमध्ये दोन जागा तर, हरियाणा, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि ओदिशा येथे प्रत्येकी एका जागेवर 3 नोव्हेंबर 2022 रोजी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.