राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवन सज्ज, आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

राज्यसभेसाठी खुले मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. तब्बल २४ वर्षानंतर राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे.

प्रातिनिधीक फोटो

सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (bjp) यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) शुक्रवारी मतदान (voting) होत असून त्यासाठी विधानभवन (vidhanbhavan) सज्ज झाले आहे. मतदानानंतर लगेच तासाभरात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केला जाईल. राज्यसभा निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाल्याने सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आमदारांची पंचतारांकित बडदास्त

राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha elections) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने (bjp) तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान परतून लावण्यासाठी महाविकास आघाडीने सज्जता ठेवली आहे. आघाडीचे आणि आघाडीला साथ देणारे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून आघाडीने आपल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली आहे. भाजपचे आमदार अलिशान हॉटेलमध्ये आहेत. या सर्व आमदारांना आज मतदानापूर्वी विधानभवनात विशेष बसने आणले जाईल.

दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव

सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत. ठाकरे हे अपक्ष आमदारांच्या तर पवार छोट्या पक्षांच्या संपर्कात आहेत. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी विधानसभेतील  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे.

वैध मतांवर ठरणार कोटा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल. मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीचे मत नसेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. पहिल्या पसंतीनंतर मतदाराला दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते देता येतील. पसंतीच्या  मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने आमदारांना मतदानाची तांत्रिक प्रक्रिया समजावून  दिली जात आहे.

खुले मतदान

राज्यसभेसाठी खुले मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. तब्बल २४ वर्षानंतर राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. विधानसभेतील निम्म्याहून अधिक सदस्य पहिल्यांदा राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत.

कोरोनाबाधित आमदारांसाठी विशेष व्यवस्था

कोरोना बाधित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आमदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर मतदान करता येईल. त्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार कोरोना बाधित असेल तर त्यांना मतदानाला येताना पीईपी किट घालून यावे लागेल. दरम्यान, आमदारांपैकी कोण कोरोना बाधित आहे किंवा कोण नाही याची माहिती अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली नाही.

निवडणुकीतील उमेदवार
भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक

शिवसेना : संजय राऊत, संजय पवार

राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल

काँग्रेस : इम्रान प्रतापगढी

सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या दरम्यान मतदान

संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल घोषित करणार