घरताज्या घडामोडीविधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षकमध्ये चुरशीची लढत

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षकमध्ये चुरशीची लढत

Subscribe

सत्ताधारी शिंदे गट-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. 5 पैकी नाशिक पदवीधर तसेच औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत होत असून या निवडणूक निकालातून मिळणारा राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल राजकीय पक्षांसाठी महत्वाचा आहे.

काँग्रेस पक्षातील अनपेक्षित बंडखोरीमुळे चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागते आहे. काँग्रेसने नाशिकमध्ये विधान परिषदेचे मावळते सदस्य डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, मात्र डॉ. तांबे यांनी अर्ज न दाखल करता आपले चिरंजीव सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या घटनेने काँग्रेसची मोठी नामुष्की झाली. शिवाय राजकीय समीकरणे बदलली. येथे काँग्रेसला आपली हक्काची जागा सोडून शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत आहे.

- Advertisement -

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने प्रथमच आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे येथून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. म्हात्रे यांना महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाळाराम पाटील यांचे आव्हान आहे. कोकण शिक्षक हा मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ होता. तो परत मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, किसन कथोरे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे येथील लढत उत्कंठावर्धक बनली आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. येथे राष्ट्रवादीसाठी अजित पवार तर भाजप उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतल्या. भाजप उमेदवाराचा प्रचार करताना फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्याला हात घातला. त्यामुळे येथील शिक्षक मतदारांचा कल कुणाकडे राहील, याविषयी उत्सुकता आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 5 जागांची मतमोजणी २ फेब्रुवारीला होऊन निवडणूक निकाल घोषित केले जाणार आहेत.

- Advertisement -

पसंतीक्रमानुसार मतदान

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होते. मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर १ पासून पुढे आकडा लिहावा लागतो. मतदारांना जेवढे उमेदवार असतील तेवढी मते देता येतात. या पसंती क्रमावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

विधान परिषद निवडणुकीतील पात्र मतदारांची संख्या

नाशिक पदवीधर… २ लाख ६२ हजार ६७८
अमरावती पदवीधर…२ लाख ६ हजार २७२
नागपूर शिक्षक….३९ हजार ८३४
औरंगाबाद शिक्षक….६१ हजार ७०२
कोकण शिक्षक…..३८ हजार ५२९

मतदारसंघनिहाय महत्वाचे उमेदवार

कोकण शिक्षक
ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), धनाजी नानासाहेब पाटील (जदयु), बाळाराम दत्तात्रय पाटील (अपक्ष)

औरंगाबाद शिक्षक
विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पाटील (भाजप), कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी) , प्रदीप सोळुंके (अपक्ष)

नागपूर शिक्षक
नागो गाणार, राजेंद्र झाडे, सुधाकर आडबाले , सतीश इटकेलवार, दीपककुमार खोब्रागडे

नाशिक पदवीधर
सत्यजित तांबे, शुभांगी पाटील, अ‍ॅड. सुभाष जंगले (सर्व अपक्ष), रतन बनसोडे (वंचित बहुजन आघाडी)

अमरावती पदवीधर
रणजित पाटील (भाजप), धीरज लिंगाडे (काँग्रेस), अनिल अमलवार (वंचित बहुजन आघाडी)

भाजप कार्यकर्त्यांचा तांबेंना पाठिंबा- विखे-पाटील
भाजपने सत्यजित तांबे यांना अधिकृत पाठिंबा दिला नाही तरी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -