देशातून नामशेष होणाऱ्या गिधाडांची आखाती देशात तस्करी, महाराष्ट्राचेही कनेक्शन

देशातून नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी एकीकडे सरकार प्रयत्न करत असतानाच गेल्या दहा वर्षांपासून समुद्रमार्गे या प्रजातीची आखाती देशात तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशच्या स्टेट टायगर टास्क फोर्सच्या कारवाईत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे यातस्करीचे महाराष्ट्र कनेकश्न असल्याचे समोर आले आहे. देशात गिधाडांच्या तस्करीची ही पहीलीच घटना आहे.

याप्रकरणी मध्यप्रदेशच्या स्टेट टायगर टास्क फोर्सने तस्कर फरीद याला ताब्यात घेतले आहे. चौकशीत फरीदने मालेगावातील हाशिद नावाच्या विदेशी पक्ष्यांचा व्यापार करणाऱ्याला सात गिधाड दिल्याची माहिती दिली. हाशिम याचे मालेगावात दुकान असून मालेगावातीलच हुसैन नावाच्या एका व्यक्तीबरोबर तो बॉक्समधून गिधाडे मुंबई बंदरावर पाठवत असल्याचे समोर आले. तिथून ही गिधाडे जहाजातून समुद्रमार्गाने आखाती देशात पाठवले जात असल्याची धक्कादायक माहिती फरीदच्या चौकशीत पुढे आली आहे. ही गिधाडे मालेगावपासून मुंबईपर्यंत पोहचवण्यासाठी तीन टोळ्या सक्रीय असल्याचे फरीदने पोलिसांना सांगितले आहे. उन्नाव जिल्ह्याजवळील एका कत्तलखान्याजवळून आणि जंगल परिसरातून ही गिधाडे पकडली जात असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून देशातून अचानक गिधाडे लुप्त होत आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून गिधाडांच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र आतापर्यंत देशात गिधाडांचीही तस्करी होत आहे यापासून सर्वच अन्नभिन्न होते. पण फरीद गिधाडे घेऊन सुलतानपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करताना एका प्रवाशाने इटारसी स्टेशन येण्याआधी डब्यात दुर्गंधी येत असल्याची टीसीकडे तक्रार केली. त्यानंतर फरीद जवळील बॉक्समध्ये गिधाड असल्याचे समोर आले आणि तस्करीचा भंडाफोड झाला.

आखाती देशांमध्ये गिधाडे घराघरात पाळली जातात. तसेच गिधाडांच्या स्पर्धाही खेळल्या जातात.