Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रWalmik Karad : बारामतीतील शेतकऱ्यांनाही कराडने घातला गंडा; माहिती मिळताच सुळेंनी फिरवला...

Walmik Karad : बारामतीतील शेतकऱ्यांनाही कराडने घातला गंडा; माहिती मिळताच सुळेंनी फिरवला फोन

Subscribe

आठवड्याभरापूर्वी वाल्मीक कराडने अनुदानाच्या नावाखाली राज्यातील 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला होता. यानंतर आता वाल्मीक कराडने बारामती मतदारसंघातील काही शेतकऱ्यांचीही अनुदानाच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला आरोपी करून त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आल्यानंतर त्याच्यासंबंधी एक ना अनेक खुलासे दररोज होताना दिसत आहेत. आठवड्याभरापूर्वी वाल्मीक कराडने अनुदानाच्या नावाखाली राज्यातील 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला होता. यानंतर आता वाल्मीक कराडने बारामती मतदारसंघातील काही शेतकऱ्यांचीही अनुदानाच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (Walmik Karad also cheated farmers in Baramati constituency)

बारामतीतील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन वाल्मीक कराडने त्यांची फसवणूक केल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने हार्वेस्टिंग मशीनसाठी देण्यात येणारे 40 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून वाल्मीक कराडने आमची फसवणूक केली. त्याने हार्वेस्टिंग मशीन घेतलेल्या शेतकऱ्याकडून अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले. मात्र अनुदान मिळाले नाही आणि वाल्मीक कराडने आमचे पैसेही आम्हाला परत केले नाहीत.

हेही वाचा – Walmik Karad : समोर आली कराडची दुसरी बायको, तिच्याही नावे करोडोची मालमत्ता

तरडोली येथील शेतकरी आणि हार्वेस्टिंग मशीनचे मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी सांगितले की, धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडचे निकटवर्तीय आहेत. धनंजय मुंडे तुम्हाला प्रत्येकी 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील, असे वाल्मीक कराडने आम्हाला सांगितले होते. पैसे दिल्यानंतर आम्ही अनुदान कधी मिळणार? याची वाल्मीक कराडकडे चौकशी करत होतो. मात्र प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात अनुदान मिळेल, असे आश्वासन कराड देत होता, अशी माहिती रामचंद्र भोसले यांनी सुप्रिया सुळेंना दिली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला आणि या प्रकरणाची चौकशी करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली.

140 हार्वेस्टिंग मशीन मालकांची कराडकडून फसवणूक

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीचे काम करणारे शेतकरी दिलीप नागणे यांनी आरोप केला होता की, वाल्मीक कराडने आमच्या मशिनला प्रत्येकी 36 लाखांचे अनुदान मिळवून देतो असे सांगून, त्याने मशीन मालकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले होते. तसेच तत्कालीन कृषीमंत्री माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, असे त्याने म्हटले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून सोलापूरसह राज्यातील 140 मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून वाल्मीक कराडला दिले होते. मात्र पैसे दिल्यानंतर आम्हाला कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आम्ही वाल्मीक कराडकडे आमचे पैसे परत देण्याची मागणी केली होती. यानंतर त्याने आम्हाला सर्वांना बीडला बोलावून मारहाण केली. वाल्मीक कराडच्या दहशतीमुळे आम्ही आतापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पण आता त्याला अटक झाल्यामुळे आम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करत आहोत, अशी माहिती दिलीप नागणे यांनी दिली होती.

हेही वाचा – बीडची संस्कृती नांदेडमध्ये रूजू देऊ नका, पालकमंत्रिपदावरून सकल मराठा समन्वयकाचा इशारा