बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. कराड हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे सर्व केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र येताना दिसले होते. यानंतर आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या फुटेजवरून वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर येत आहे. (Walmik Karad journey from Beed to Pune in a car with other accused)
वाल्मीक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात सीआयडीकडे शरण आला होता. मात्र आता व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजवरून वाल्मीक कराडने इतर आरोपींसोबत 31 डिसेंबरच्या आधी बीड ते पुणे प्रवास केल्याचे समोर येत आहे. या बाबतीत पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून वाल्मीक कराड हा पुण्याला गेल्याची चर्चा आहे. पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे.
हेही वाचा – Congress Vs Mahayuti : दिखावा हा महायुती सरकारच्या कार्यपद्धतीचा भाग, सचिन सावंत यांची टीका
वाल्मीक कराडने बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच यानंतर त्याने एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे 30 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वा. 36 मिनिटांनी पास झाल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना वाल्मीक कराड ज्या गाडीतून आला होता, ती गाडी याच ताफ्यातील होती. त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
निलंबित पीएसआय राजेश पाटीलही कराडसोबत
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिकेत राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील वाल्मीक कराडसोबत दिसून आले होते. त्यामुळे आवादा कंपनीकडून ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली होती, त्यादिवशी पीएसआय राजेश पाटील हे वाल्मीक कराडला का भेटले असावेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण याआधी आवादा कंपनीमधील वॉचमेनला मारहाण झाली होती, त्याच्या एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये वाल्मीक कराडसोबत दिसले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राजेश पाटील हे वाल्मीक कराडसोबत दिसून आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता निलंबित पीएसआय राजेश पाटील यांची देखील सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांजवळील तुमची आसनव्यवस्था का बदलली? अजितदादांच्या उत्तरानं हशा पिकला