सोलापूर – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. एकीकडे वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याच्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
सुशील मांजली वाल्मिक कराडची देखील वडील वाल्मिक कराडप्रमाणेच परळीत दहशत असल्याची माहिती समोर येत आहे. सुशील कराडच्या दहशतीमुळे एक कुटुंब परळी सोडून सोलापूरला स्थलांतरीत झाले. सुशील कराडच्या कंपनीतील मॅनेजरला तुझ्याकडे एवढे पैसे कसे आले असे म्हणत नेहमी मारहाण केली जात होती. त्यामुळे त्याने परळी सोडली. त्यानंतर परळीत राहात असलेल्या त्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली. आता मॅनेजरच्या पत्नीने पोलीस तक्रार घेत नाही म्हणून सोलापूर न्यायालयात धाव घेतली. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुशील कराडच्या छळवणुकीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 13 जानेवारी रोजी सुनावणी आहे, अशी माहिती त्यांच्या वकीलाने दिली आहे.
सुशील कराडने सोनं विकलं, गाड्या, जमीन-घर बळकावल्याचा आरोप
सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन सहकारी अनिल मुंडे आणि गोपीनाथ गुंजेवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील पीडित महिलेचा पती हा सुशील कराड याच्याकडे काम करत होता. सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले? तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा आल्या? यावरुन त्याला सतत मारहाण करत होता. सुशील, अनिल आणि गोपीनाथ या तिघांनी त्याचे राहते घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. त्याच्या दोन बल्कर ट्रक आणि दोन गाड्या ताब्यात घेतल्या. गाडीच्या चाव्या, कागदपत्र त्याच्याकडे ठेवून घेतली. इतकंच नाही तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील एका सराफाकडे विक्री करुन त्याचे पैसे तिघांनी घेतले. परत त्याला मारहाण केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर आता पीडित कुटुंबाने कोर्टात धाव घेतली आहे.
हेही वाचा : Polling in Parli : अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नसतील, आव्हाडांकडून आणखी एक व्हिडीओ शेअर