बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या पोटदुखीच्या कारणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. वाल्मिक कराडचे हे नाटक सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी कराडच्या आयसीयूमधील उपचारावर मोठे वक्तव्य केले आहे. वाल्मिक कराडवर आयसीयूमध्ये उपचार होत आहेत म्हणून इतर रुग्णांना आयसीयूमधून दुसरीकडे हलवण्यात आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
ICU मधील इतर रुग्णांना हलवले
आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मीक कराड ज्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे, तिथे उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांना वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.आमदार धस यांनी रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. एका आरोपीसाठी इतर रुग्णांना त्रास होणं योग्य नाही. या संबंधी रुग्णालय प्रशासनासोबत बोलणार आहे, असे आमदार धस माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना उचलून आर्थररोड तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. वाल्मिक कराडला लागलीच न्यायलयीन कोठडी देण्यात आली. आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही सर्व थेरं चालू आहेत. या सर्व आरोपींना आर्थर रोड तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रिया दमानियांनी व्यक्त केली. तर धनंजय मुंडे यांच्या हस्तक्षेपामुळेच आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके तसेच भाजप आमदार सुरेश धस करत आहेत.
महादेव मुंडेच्या खूनावेळी सुशील कराडने 150 फोन का केले?
आमदार सुरेश धस म्हणाले की, महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी खून झाला होता. त्याचा तपास अजून लागत नाही. हा तपास एलसीबीकडे देण्याची मागणी आमदार धस यांनी केला. महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा केली असल्याचे सांगत आमदार धस म्हणाले, महादेव मुंडेंचे मारेकरी पुढच्या 15 दिवसांत सापडले पाहिजे. बीड जिल्ह्याचे पोलीस दल पूर्ण बदनाम झाले आहे. कराड आणि पोलीस अधिकारी बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तेच बल्लाळ कराडला कोर्टातून तुरुंगात घेऊन जात आहे. त्यावेळी ते कराडचा पीए कसा बसेल याची काळजी घेताना दिसत आहे. महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा कराडचा मुलगा सुशील कराड याने पोलिस निरीक्षक रविंद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकावर अर्धा तासांत 150 वेळा फोन केले. खून झाला तेव्हा एवढे फोन कशासाठी गेले गेले? याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. आमदार धसांच्या या नवीन आरोपामुळे आता वाल्मिक कराडची मुलेही खूनाच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Shiv Sena UBT : कोकणात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली; मेळाव्याला अनेक आमदार, खासदारांची गैरहजेरी