Homeमहाराष्ट्रWaqf Board : मुस्लिम समाजाचा नवा मसिहा उद्धव ठाकरे, चित्रा वाघांची टीका

Waqf Board : मुस्लिम समाजाचा नवा मसिहा उद्धव ठाकरे, चित्रा वाघांची टीका

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी 'वक्फ'च्या मनमानीला, लॅन्ड जिहादला पाठिंबा दिला आहे. ज्या 'वक्फ'ने हिंदू शेतकऱ्यांच्या, आपल्या देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या, त्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या विरोधात यांनीच मतदान केले.

(Waqf Board) मुंबई : बहुचर्चित आणि वादग्रस्त वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या 44 शिफारशी फेटाळण्यात आल्या. तर सत्ताधाऱ्यांच्या 22 शिफारसी मान्य करण्यात आल्या. यासंदर्भात भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता मुस्लिम समाजाचे नवे मसिहा झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे. (Chitra Wagh targets Uddhav Thackeray)

वक्फ कायद्यामध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्यावर्षी वक्फ दुरुस्ती विधेयक आणले आहे. संसदेमध्ये या विधेयकाला विरोधकांकडून विरोध झाल्याने मोदी सरकारने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवले. या जेपीसीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे खासदार जगदंबिका पाल आहेत. अनेक मुस्लिम खासदारांनाही जेपीसीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या जेपीसीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितले की, सहा महिन्यांच्या दीर्घ चर्चेनंतर आम्ही समितीच्या सगळ्या सदस्यांकडून प्रस्ताव मागितले होते. एकूण 44 सुधारणांवर चर्चा झाली. विरोधकांनी सुचवलेल्या काही सुधारणांचाही त्यात समावेश होता. त्या देखील आम्ही पटलावर ठेवल्या आणि त्यावर मतदान झाले. मात्र, त्याच्या समर्थनार्थ केवळ 10 मते होती तर विरोधात 16 मते होती. यानंतर विरोधकांनी सुचविलेल्या सुधारणा फेटाळण्यात आल्या.

याच अनुषंगाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोस्ट शेअर केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘वक्फ’च्या मनमानीला, लॅन्ड जिहादला पाठिंबा दिला आहे. ज्या ‘वक्फ’ने हिंदू शेतकऱ्यांच्या, आपल्या देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या, त्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या विरोधात यांनीच मतदान केले. उद्धव ठाकरे यांच्या रूपात महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला नवीन मसिहा मिळाला आहे, अशी टीका करतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला जनता नक्कीच धडा शिकवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावरही निशाणा साधला आहे. शरद पवार गटाचे खासदार मतदानावेळी गैरहजर राहिले म्हणजे नेहमीप्रमाणे दोन दगडांवर पाय ठेवले, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Waqf Board: Chitra Wagh targets Uddhav Thackeray)

हेही वाचा – Unemployment : त्या व्हिडीओने केली मोदी-फडणवीस सरकाराच्या दाव्यांची पोलखोल, ठाकरेंचा घणाघात